•जीसीईटी परीक्षेचा निकाल जाहीर
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): ‘जीसीईटी’ परीक्षेत वास्को येथील सुसाना थॉमस या विद्यार्थिनीने सर्व विक्रम मोडून वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे. तिने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांत २२५ गुणांपैकी २१७ गुण मिळवत उच्चांक नोंदवला आहे. यापूर्वी जीसीईटी परीक्षेत सर्वाधिक २१० गुण मिळाले होते. करंझाळे पणजी येथील सौरभ शैलेश शेणवी उजगावकर याने भौतिकशास्त्र आणि गणित विषयात सर्वांत जास्त गुण मिळवून अभियांत्रिकी शाखेत जागा निश्चित केली आहे. त्याला या दोन्ही विषयात १५० पैकी १४० गुण मिळाले आहेत. सौरभ हा मुष्टिफंड उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे. तर, सुसाना ही वास्को येथील नेव्ही चिल्ड्रन विद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
सुसाना हिने भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात १४४ गुण मिळवून फार्मसी शाखेतही प्रवेश मिळवण्याचा मार्ग सोपा केला आहे. मात्र, आपण गोवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून मिशनरि डॉक्टर होण्याची इच्छा सुसाना हिने व्यक्त केली आहे. सुसाना हिचे आई वडील वास्को येथील गोवा शिपयार्डमध्ये नोकरी करीत असून तिचे काका आणि काकी डॉक्टर असून तामिळनाडू राज्यात सेवाभावी काम करीत आहेत. त्यांच्याप्रमाणेच आपल्यालाही गरिबांसाठी सेवा करायचे असल्याचे तिने सांगितले.
सौैरभ याचे वडील शैलेश हे पेशाने सीए असून आई गृहिणी आहे. काही महिने आर्यन कोचींगमध्ये धडे घेतल्यानंतर घरीच १० ते १२ तास अभ्यास करीत होतो, असे सौरभ याने सांगितले. आपण मेकॅनिकल इंजिनिअर होणार असून आयआयटीत प्रवेश मिळण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे तो म्हणाला.
दि. १८ ते २७ पर्यंत व्यावसायिक शाखेत प्रवेश मिळवण्याचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज उत्तर गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षण संचालनालयात तर, दक्षिण गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी मडगाव येथील रवींद्र भवनात अर्ज उपलब्ध केले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. जीसीईटी परीक्षेचे व्यवस्थापन पाहणारे मुंबई आयआयटीचे प्रा. दीपन घोष म्हणाले की, यावर्षी पहिल्यांदाच परीक्षेनंतर तीन दिवसांत निकाल जाहीर केला आहे. यापूर्वी ५ दिवसांनी निकाल जाहीर केला होता. जीसीईटी परीक्षा ही वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी आणि होमिओपथिक या व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याचा मार्ग असल्याचे प्रा. घोष यावेळी म्हणाले.
‘एआयसीटी’ने परवानगी दिल्यास येत्या शैक्षणिक वर्षापासून फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात खाण अभियांत्रिकी शाखा सुरू केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Tuesday, 17 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment