• तपासावर जातीने लक्ष ठेवणार
• कावरेवासीयांची भेट घेण्यास तयार
मडगाव, दि. १४ (प्रतिनिधी): गोव्याचे नवनियुक्त पोलिस महासंचालक डॉ. आदित्य आर्य यांनी आज येथील हॉस्पिसियोमध्ये उपचार घेत असलेल्या कावरे खाणविरोधी गटाचा नेता नीलेश गावकर याची भेट घेऊन विचारपूस केली. कावरे येथील बेकायदा खाणींविरुद्ध लढा देणार्या नीलेशवर दोन दिवसांपूर्वी वेर्णा औद्योगिक वसाहतीत झालेल्या प्राणघातक हल्ल्यासंबंधी काल ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या नेत्यांनी दिलेल्या इशार्यानंतर पोलिस महासंचालक आर्य यांनी नीलेशची भेट घेऊन हल्ल्यासंबंधी त्याच्याकडून माहिती करून घेतली.यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक व बिगर सरकारी संस्थांच्या प्रतिनिधींशी आपण बोलणी केलेली असून, नीलेशला इस्पितळात सुरक्षा पुरवणे, उपचारासाठी वेगळी खोली देणे व आपण स्वत: येऊन त्याची भेट घेऊन चौकशी करणे या तिन्ही मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
आज दुपारी १२ वा. पोलिस महासंचालकांनी पोलिस अधीक्षक टोनी फर्नांडिस, उपअधीक्षक उमेश गावकर, वेर्णा पोलिस स्टेशनचे निरीक्षक ब्राझ मिनेझीस, ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे ऍड. सतीश सोनक व अन्य बिगर सरकारी संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत इस्पितळात उपचार घेत असलेल्या नीलेश गावकरची भेट घेऊन सविस्तर माहिती मिळविली. कावरे खाणीविरुद्ध आपण लढा सुरू केल्यानंतर आपल्याला निनावी फोनवरून धमक्या दिल्या जात होत्या. त्या मडगाव येथूनही मिळत होत्या, आणि या हल्ल्यामागे खाण माफिया असावेत असा संशय नीलेश याने यावेळी व्यक्त केला. आपण हल्लेखोराला ओळखत नाही पण समोर आल्यास ओळखू शकेन असेही त्याने सांगितले.
पोलिस महासंचालक आर्य यांनी आपण या प्रकरणात व्यक्तिशः लक्ष घालणार तसेच चौकशीवर लक्ष ठेवून हल्लेखोरांना निश्चित अटक करणार, असे आश्वासन दिले. त्यासंबंधी आपण यापूर्वीच पोलिस अधीक्षक व उपअधीक्षकांशी चर्चा केलेली आहे. वेर्ण्याचे पोलिस निरीक्षक ब्राझ मिनेझीस यांनी योग्य पद्धतीने तपास केलेला आहे. हल्ला झाल्यावेळी त्या कारखान्याबाहेर असलेले सुरक्षा रक्षक व उपस्थित कर्मचार्यांच्या जबान्या घेण्यात आल्या आहेत, असे त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.
खनिज वाहतूक उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमानुसार चालते की नाही याची पाहणी करण्यासाठी संबंधित सरकारी अधिकारी, ऍड. सतीश सोनक व आदिवासी जमाती समितीचे सदस्य यांची संयुक्त दक्षता समिती तयार केली जाणार आहे. समितीमार्फत पाहणी झाल्यानंतर जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. हल्लेखोराला पकडण्यासाठी आणखी किती दिवस लागतील, असे विचारले असता, त्याच दृष्टिकोनातून आमचा तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.
नीलेश गावकरवर पुन्हा हल्ला होण्याची भीती असल्याने त्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी बिगर सरकारी संस्थानी केली होती. कावरे येथे बिगर सरकारी संस्थांचे प्रतिनिधी व आदिवासी लोकांच्या प्रतिनिधीची बैठक बोलावून त्यांना दिलासा द्यावा व मार्गदर्शन करावे अशी मागणी सतीश सोनक यांनी केली होती. त्याला मान्यता देऊन कोणत्याही वेळी बैठक बोलावल्यास आपण तेथे येण्यास तयार आहे असे आर्य यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या बिगर सरकारी संस्थांच्या नेत्यांशीही चर्चा केली.
Sunday, 15 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment