Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 19 May 2011

भाजपपुढे झुकले भारद्वाज

येडयुरप्पांकडे बहुमत असल्याची जाहीर कबुली
बंगलोर, दि. १८ : गेल्या आठवडाभरापासून कर्नाटकचे भारतीय जनता पक्षाचे सरकार अस्थिर करण्याच्या कामात गुंतलेले राज्यपाल हंसराज भारद्वाज यांनी आज अखेर जाहीरपणे येडियुरप्पा यांच्या सरकारकडे बहुमत आहे आणि यात आम्हांला अजिबात संशय नसल्याचे कबूल केले.
राज्यपाल भारद्वाज यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्यानंतर गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये राज्यपाल-मुख्यमंत्री असा संघर्ष सुरू झाला. या घडामोडीनंतर प्रथमच आज सकाळी भारद्वाज आणि येडियुरप्पा एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर होते. या कार्यक्रमात भारद्वाज यांनी आश्‍चर्यकारकरित्या येडियुरप्पा आणि त्यांच्या सरकारवर स्तुतीसुमने उधळली. पण, आपल्याला परत पाठविण्याच्या भाजपच्या मागणीवर बोलताना ते म्हणाले की, राज्यपाल म्हणून माझी नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आणि त्यांच्याशिवाय कोणीही मला परत बोलावू शकत नाही. मला घटनेतील तरतुदींनुसारच काम करायचे आहे याची पूर्ण कल्पना आहे, असेही ते म्हणाले.
आज दिल्लीहून परतलेले येडियुरप्पा बरेच निश्‍चिंत दिसत होते. व्यासपीठावर बाजूूबाजूला बसलेले भारद्वाज आणि येडियुरप्पा थोड्या-थोड्या वेळाने एकमेकांशी काहीतरी बोलत असल्याचेही टिपण्यात आले. आपल्या भाषणात राज्यपाल म्हणाले की, मुख्यमंत्री हे राज्यात निवडून आलेले प्रतिनिधी आहेत. त्यांच्याजवळ प्रचंड बहुमत आहे. याविषयी आम्हांला अजिबात शंका नाही आणि आम्ही दोघे चांगले मित्रही आहोत. निर्माण झालेला राजकीय तणाव अप्रसांगिक असा आहे. आपल्याला अशा स्थितीत कायदा आणि घटना यांच्यानुसारच वागावे लागणार आहे. माझे हात घटनेने बांधलेले आहेत.
कर्नाटकमध्ये आपल्या सरकारला चांगली ख्याती मिळावी, अशी आपली इच्छा आहे. ‘अतिथी देवो भव’ ही आपली संस्कृती आहे आणि राज्यपाल म्हणून मी राज्यात अतिथी आहे, असेही भारद्वाज म्हणाले.
येडियुरप्पांची वारेमाप स्तुती
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची स्तुती करताना भारद्वाज म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी ते कठोर परिश्रम घेत आहेत. अतिशय मेहनती मुख्यमंत्री असे मी त्यांना म्हणेन. ते दिवसाला १८ ते २० तास काम करतात. त्यांच्याविरोधात माझ्या मनात काहीही नाही. माझ्या चपराशापासून सचिवापर्यंत सर्वांशी माझी वागणूक आपुलकीची आणि प्रेमाची असते. त्या बदल्यातही मला तेच मिळावे, अशी माझी अपेक्षा आहे. मी माझ्या जीवनात कधीही पक्षपात केला नाही. तसा प्रकार येडियुरप्पांच्या बाबतीतही करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असेही राज्यपाल म्हणाले.
यावेळी बोलताना येडियुरप्पा म्हणाले की, राजकारणात येण्यापूर्वी मी एक लिपिक म्हणून सरकारी नोकरीत होतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी अनेक धडे गिरविले. आगामी दोन वर्षेही पारदर्शक प्रशासन देण्याकडे आपले लक्ष राहणार आहे. त्यासाठी सर्व वरिष्ठांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी राज्यपालांना संबोधून केली.

No comments: