सभापतींना मिकींकडून नव्याने याचिका सादर
मडगाव, दि. १४ (प्रतिनिधी): सेव्ह गोवा फ्रंटचे अस्तित्व अजूनही कायम आहे असा निवाडा निवडणूक आयोगाने दिल्यामुळे यापूर्वी त्या पक्षाचे झालेले विलीनीकरण बेकायदा ठरत आहे. पक्षांतरबंदी कायद्याखाली चर्चिल आलेमाव व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना अपात्र ठरवावे अशी विनंती करणारी नवीन याचिका बाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांनी सभापती प्रतापसिंह राणे यांना सादर केली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात नवा राजकीय अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
आज येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत मिकी पाशेको यांनी ही माहिती दिली. आपण २००८ मध्ये सादर केलेल्या याचिकेत सुधारणा करूनही नवी याचिका दाखलकरण्यात आली आहे. ती याचिका मागे घेणे हा आपला एक डावपेच होता. वास्तविक सभापतींनी आपल्या याचिकेनुसार त्या दोन्ही आमदारांना अपात्र केले असते तर आज त्यांच्याकडून सुरू असलेली लूट थांबली असती. ही लूट करण्यासाठीच त्यांनी सेव्ह गोवा पक्ष बेकायदेशीर पद्धतीने विलीन केला होता, असा दावा मिकी यांनी केला. प्रत्यक्षात पक्षाची आमसभाच घेण्यात आली नव्हती व निर्वाचन आयोगाचा निवाडा तेच स्पष्ट करतो. आपण त्या संदर्भातील सर्व दस्तऐवज पुन्हा सभापतींना सादर केले असून उभयतांना त्याच मुद्यावर अपात्र ठरवावे अशी मागणी केली आहे, असे मिकी म्हणाले.
सार्वजनिक बांधकाम खात्यात सध्या अराजक सुरू आहे. नियमबाह्य आदेश न जुमानणार्या अभियंत्यांची तडकाफडकी बदली केली जाते वा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले जाते. यामुळे सरकारी अधिकार्यांचे नीतिधैर्य खच्ची होत आहे व त्यासाठी आपल्या याचिकेवर त्वरित निर्णय द्यावा अशी विनंती केल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
Sunday, 15 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment