नीलेश गावकर हल्लाप्रकरण
भाजयुमोचे पोलिस महानिरीक्षकांना निवेदन
पणजी, दि.१८ (प्रतिनिधी): कावरे येथील बेकायदा खाणीविरुद्ध आवाज उठवणार्या नीलेश गावकर या तरुणावर हल्ला करणार्या हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याची मागणी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चातर्फे आज (दि.१८) करण्यात आली. पणजी येथील पोलिस मुख्यालयात आज भाजयुमोचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली वरील मागणीचे निवेदन पोलिस प्रमुखांना देण्यात आले. या वेळी सरचिटणीस सिद्धेश नाईक, उपाध्यक्ष विनय गोवेकर, खजिनदार मिलिंद होबळे, दक्षिण गोवा अध्यक्ष भावेश जांबावलीकर व इतर युवा कार्यकर्ते उपस्थित होते. गोव्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली असून नीलेश गावकर याच्यावर हल्ला करणार्यांना अजून अटक झालेली नाही. त्यामुळे सदर हल्लेखोरांना त्वरित अटक करा, अशी मागणी यावेळी युवा मोर्चातर्फे करण्यात आली. पोलिस महानिर्देशक डॉ. आदित्य आर्या यांनी या प्रकरणी तपास चालू असून युवा मोर्चाच्या सदस्यांनी या प्रकरणात पोलिसांना मदत करावी अशी सूचना या वेळी केली. या प्रकरणी आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देऊन बाहेर आल्यानंतर डॉ. सावंत यानी गोव्यात आमआदमी सुरक्षित नाही असे सांगून सरकारच्या नाकर्तेपणामुळे व सरकार बेकायदा खाणींना अभय देत असल्यामुळे नीलेश गावकर याच्यासारख्यांवर हल्ले होत असल्याचे प्रतिपादन केले. हल्लेखोरांचा शोध न लावल्यास गोव्यात इतरत्र असे हल्ल्याचे प्रकार होतील अशी भीती डॉ. सावंत यांनी यावेळी व्यक्त केली.
सिद्धेेश नाईक यांनी या प्रकरणी हल्लेखोरांना त्वरित अटक न झाल्यास युवा मोर्चाचे सदस्य रस्त्यावर उतरतील असा इशारा यावेळी दिला.
Thursday, 19 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment