Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 17 May 2011

पेट्रोल दरवाढीविरोधात भाजपचा निषेध मोर्चा

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): देशात एकीकडे महागाईने उच्चांक गाठला असतानाच पेट्रोल दरात अचानक ५ रुपये प्रतिलीटर वाढ करून केंद्रातील ‘युपीए’ सरकारने सामान्य जनतेच्या कंबरड्यातच लाथ हाणली आहे, अशी खरमरीत टीका भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी केली. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अर्थसंकल्पात १ एप्रिलपासून पेट्रोलजन्य पदार्थांवर २ टक्के अतिरिक्त कर आकारणीचा घेतलेला निर्णय ताबडतोब मागे घ्यावा व निदान गोमंतकीयांना तरी या वाढीपासून दिलासा द्यावा, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.
केंद्रातील ‘युपीए’ सरकारने पेट्रोल दरात केलेल्या अन्यायकारक वाढीच्या विरोधात आज देशभरात झालेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून गोवा प्रदेश भाजपतर्फे पणजीत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. भाजप मुख्यालयाखाली झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी विविध वक्त्यांनी आपल्या भाषणात या पेट्रोलदरवाढीचा जाहीर निषेध केला. याप्रसंगी साळगावचे आमदार दिलीप परूळेकर, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होताच ही दरवाढ घोषित करण्यात आली. केवळ मतांवर डोळा ठेवून ही वाढ घोषित करण्यास कॉंग्रेस धजत नव्हती. विधानसभा निवडणुकीत जनतेने कॉंग्रेसला धुडकावल्यानेच ही वाढ जाहीर करण्यात आल्याचा ठपकाही यावेळी ठेवण्यात आला. ‘आम आदमी’ च्या नावाने कॉंग्रेसने जनतेची निव्वळ थट्टा चालवली आहे. सामान्य जनतेशी आपल्याला काहीही देणेघेणे नाही, अशा आविर्भावातच कॉंग्रेस वागत असल्याचा आरोपही यावेळी श्री. आर्लेकर यांनी केला. सामान्य जनतेच्या खिशाला हात घालण्यापेक्षा भ्रष्ट मार्गाने अमाप पैसा कमवलेल्या मंत्र्यांच्या खिशाला हात घालाल तर त्यातून सामान्य लोकांचे अनेक प्रश्‍न सोडवता येतील, अशी मल्लिनाथीही श्री. आर्लेकर यांनी केली.
केंद्रातील ‘युपीए’ व गोव्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारने जनतेला पूर्णपणे वेठीस धरले आहे. या सरकारच्या कारभारामुळे सामान्य जनतेचे जगणे हैराण बनले असून आता या सरकारांना घरी पाठवण्यातच जनतेचे हित आहे, असा सल्ला साळगावचे आमदार परूळेकर यांनी दिला. कॉंग्रेसच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळेच हे संकट जनतेवर ओढवले आहे व त्यामुळे देशासह, प्रत्येक राज्य, मतदारसंघ व गावागावात लोकांनी याविरोधात दंड थोपटायला हवेत, असेही ते म्हणाले. याप्रसंगी भाजयुमोचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, ऍड. सोमनाथ पाटील, दत्तप्रसाद मधुकर नाईक, पणजी मनपाचे नगरसेवक शुभम चोडणकर आदींची समयोचित भाषणे झाली. भाजप पणजी मंडळाचे अध्यक्ष पुंडलिक राऊत देसाई यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी ‘युपीए’च्या अध्यक्ष सोनिया गांधी व केंद्रीय वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

No comments: