Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 15 May 2011

पेट्रोल ५ रुपयांनी महाग

नवी दिल्ली, दि. १४ : पाच राज्यांतील निवडणुकांचा निकाल घोषित झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी केंद्र सरकारने पेट्रोल दरवाढीच्या कागदावर पाच रुपयांचा शिक्का मारला आहे. यामुळे वाढत चाललेली महागाई आज ना उद्या कमी होईल, ही जनसामान्यांची आशा धुळीला मिळवली आहे. पेट्रोलच्या किमतीत लीटरमागे तब्बल पाच रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज सरकारी तेल कंपन्यांनी घेतला असून ही दरवाढ मध्यरात्रीपासूनच लागू होणार आहे.
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच केंद्र सरकारनं पेट्रोल दरवाढीला हिरवा कंदील दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्याने जानेवारीपासूनच तेल कंपन्यांना पेट्रोल दरवाढीची संमती हवी होती. परंतु, ही दरवाढ पाच राज्यांच्या निवडणुकीत आपल्याला महागात पडू शकते, हे ओळखून पेट्रोलियम खात्याने कंपन्यांना सबुरीचा सल्ला दिला. इतकेच नव्हे तर, दर लीटरमागे होणारा आठ रुपयांचा तोटा भरून काढण्याची तयारीही त्यांनी दाखवली. परंतु, ही तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकार निवडणूक निकालानंतर पेट्रोल दरवाढ करणार, हे निश्‍चित होते. पेट्रोलच्या दरात किमान तीन रुपयांची वाढ होणार असल्याचे संकेत मिळत होते. परंतु, आज तब्बल पाच रुपयांची दरवाढ करत आधीच महागाईने कंबरडे मोडलेल्या जनतेवर सरकारने आणखी ओझे लादले.
गेल्या दोन वर्षांत पेट्रोलच्या दरात तब्बल १८ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. बदलत्या आंतरराष्ट्रीय दरानुसार पेट्रोलचे दर कमी-जास्त करण्याचे स्वातंत्र्य सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना दिल्यापासून तर दरवाढ जोरात सुरू आहे. येत्या काळातही इंधनाच्या किमती अशाच चढत राहतील, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतीत इतक्यात वाढ होणार नसल्याची दिलासादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे, पेट्रोल इंजिनच्या गाडीवाल्यांनी पेट्रोल पंपाकडे धाव घेतल्याने सर्वच पेट्रोलपंपांवर रांगा लागल्याचे चित्र आहे.
-----------------------------------------------------------------
गेल्या नऊ महिन्यांतली ही नववी दरवाढ असून पाच रुपयांनी पेट्रोलच्या किमती वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. पेट्रोल दरवाढीमुळे दळणवळणाचा खर्च वाढणार असल्याने पुन्हा एकदा महागाई वाढणार आहे.
-------------------------------------------------------------------
राज्यातील बहुतांश भागात पेट्रोलचे दर रु. ५९.०९ एवढे होते. आता यात ५ रुपयांची वाढ करण्यात आल्याने हे दर सुमारे ६४.०९ एवढे असतील, अशी माहिती पेट्रोलपंप मालक संघटनेचे अध्यक्ष परेश जोशी यांनी वास्को प्रतिनिधीशी बोलताना दिली. दरम्यान, अद्याप सुधारित दराबाबत सूचना मिळालेली नसल्याचे ते म्हणाले.

No comments: