पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोणत्या आधारावर उत्तीर्ण करता येईल याविषयीचे मार्गदर्शक तत्त्वे हाती आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची भूमिका आज गोवा मुख्याध्यापक संघटनेने घेतली आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने जारी केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त परिपत्रकाला विरोध करणार्या मुख्याध्यापकांच्या संघटनेत दोन गट निर्माण झाला आहे.
दुसर्या गटाने कोणत्याही परिस्थितीत खात्याने उशीरा हाती दिलेले ‘ते’ परिपत्रक या वर्षी लागू करू नये, अशी ठाम भूमिका घेतली आहे. आज सकाळी गोवा मुख्याध्यापक संघटनेच्या सर्व साधारण झालेल्या बैठकीत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे परिपत्रक यावर्षी लागू करणे शक्य नसल्याचा ठराव घेतला. यावेळी सुमारे ५० ते ६० विद्यालयांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या ठरावाची प्रत घेऊन शिक्षण खात्याच्या संचालिका सेल्सा पिंटो यांची संघटनेचे अध्यक्ष संजीव सावंत व अन्य सदस्यांनी भेट घेतली असता ते, परिपत्रक अमलात आणण्यासाठी मार्गदर्शकतत्त्वे हाती आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची भूमिका या संघटनेने घेतली. या शिष्टमंडळात संघटनेचे माजी अध्यक्ष फा. सायमन साव्हियो फर्नांडिस, गोविंद देव व चंद्रकांत हेदे सहभागी होते.
सर्वसाधारण बैठकीनंतर सर्व मुख्याध्यापकांनी आपला मोर्चा शिक्षण खात्याकडे वळवला. यावेळी मुख्याध्यापकांच्या शिष्टमंडळाला भेट देण्यास संचालिका सेल्सा पिंटो यांनी नकार दिला. यावेळी मुख्याध्यापकांनी अनेक विनवण्या केल्यानंतर चार जणांच्या शिष्टमंडळाला भेटण्यास सहमती दर्शवली. परंतु, मुख्याध्यापकांचे शिष्टमंडळ प्रत्यक्ष त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांच्यावर पिंटो यांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. परिपत्रकाला विरोध केल्यास किंवा त्याचे पालन न केल्यास विद्यालयाचे अनुदान थांबवू, अशी धमकीही देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
यानंतर संघटनेचे अध्यक्ष श्री. सावंत यांनी शिक्षण खात्याने मार्गदर्शनतत्त्वे येत्या दोन दिवसात देणार असल्याचे सांगितले. यावर बाहेर जमलेल्या मुख्यध्यापकांनी जोरदार विरोध दर्शविला. खात्याच्या कोणत्याही मार्गदर्शनतत्त्वाची गरज नसून यावर्षी ते परिपत्रक लागू करणे शक्य होणार नसल्याचे या मुख्यध्यापकांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झालेला आहे. तर, नवीन प्रवेशप्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कोणत्या आधारावर उर्त्तीण करावे, असा प्रश्न, दुसर्या गटाच्या मुख्याध्यापकांनी उपस्थित केला आहे.
Tuesday, 17 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment