Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 16 May 2011

‘पीएसी’ निर्देशांनुसार आजपासून खनिज वाहतुकीचे नियमन

सांगे व केपे तालुक्यातून सुरुवात
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): लोकलेखा समितीने (पीएसी) बेकायदा खाण व बेदरकार खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणांना दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी उद्या सोमवार १६ मेपासून सुरू होणार आहे. खाण तथा वाहतूक खात्याकडून या निर्देशांची कार्यवाही होणार असली तरी प्रत्यक्षात खनिज वाहतुकीला शिस्त लावण्यात ही खाती कितपत यशस्वी ठरतात व खनिज वाहतूकदार तथा खाण कंपनी या निर्देशांच्या अंमलबजावणीला कितपत सहकार्य करतात यावरच या मोहिमेचे यश अवलंबून राहणार आहे.
विरोधी पक्षनेते तथा ‘पीएसी’चे अध्यक्ष मनोहर पर्रीकर यांनी बेकायदा खाण व बेशिस्त खनिज वाहतुकीवरून सरकारी अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. यासंबंधी समितीच्या सदस्यांनी एक नियोजित कृती आराखडाच तयार केला आहे व त्याच्या पूर्ततेचे आदेश खाण, वाहतूक, जिल्हाधिकारी व पोलिसांना दिले आहेत. खाण खात्याने खनिज वाहतुकीसाठी खास नियमावली तयार केली आहे व त्याची कार्यवाही उद्या १६ पासून सुरू करण्याचे आदेश खाणमंत्री तथा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिले आहेत. या निर्देशांच्या कार्यवाहीची जबाबदारी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्यावर सोपविण्यात आली असून २० मेपर्यंत प्रत्यक्ष कृती पूर्तता अहवाल ‘पीएसी’ला सादर करण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत.
खाण खात्याने जारी केलेल्या आदेशात खास नियमावली तयार केली आहे. पहिल्या टप्प्यात सांगे व केपे तालुक्यांत या नियमावलीची कार्यवाही होईल. कावरे भागात सध्या तीन खाणी सुरू आहेत. खनिज वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक खाण कंपनीला आठवड्यातील दोन दिवस खनिज वाहतूक करण्याची परवानगी असेल. यानुसार प्रत्येक दिवशी किमान ६०० खनिज ट्रकांनाच वाहतुकीसाठी परवानगी दिली जाईल. ट्रकांची गती व इतर आवश्यक नियमही घालून दिल्याने वाहतुकीची कोंडी टळेल, असा विश्‍वास खाण खात्याने व्यक्त केला आहे. मर्यादेपेक्षा जास्त टन खनिजाची वाहतूक तसेच इतर नियमांची पूर्तता करण्यास हयगय करणार्‍या ट्रकांचे परवाने रद्द करण्याचे प्रयोजन या आदेशांत करण्यात आले आहे. खनिज ट्रकांची नोंदणी खाण खात्याकडे करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जाईल. या नियमावलीप्रमाणे खनिज वाहतूक केल्यास प्रत्येक खनिजवाहू ट्रकाला आठवड्यात किमान तीन फेर्‍या मिळतील, असेही सांगण्यात आले. कोळंब ते तिळामळ या भागात सध्या ११ खाणी सुरू आहेत तर मायणा-कावरे ते सावर्डे या भागात ३ खाणी सुरू आहेत.
खनिज वाहतुकीसाठी ट्रकांना पासेसची सक्ती करण्यात आली आहे व या पासेसच्या वितरणाचीही व्यवस्था खाण खात्याने केली आहे. खनिज वाहतुकीसाठीचा पास न घेता खनिजाची वाहतूक करणार्‍या ट्रकांचे परवाने रद्द करण्याचेही ठरवण्यात आले आहे. दरम्यान, खनिज वाहतुकीचा हंगाम आता केवळ काही दिवसच सुरू राहणार आहे. आता शेवटच्या क्षणी या निर्देशांनुसार खनिज वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी ही मोहीम प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार असून ती यशस्वी ठरल्यास पुढील हंगामात ही पद्धत सर्वत्र राज्यभर राबवण्यात येईल, अशी माहितीही खाण अधिकार्‍यांनी दिली.

No comments: