Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 16 May 2011

कावरेवासीयांची मुख्यमंत्री निवासासमोर निदर्शने

० नीलेश गावकर हल्लेखोरांच्या अटकेची मागणी
० दोन संशयितांची नावे मुख्यमंत्र्यांकडे सादर

मडगाव, दि.१५(प्रतिनिधी): कावरे येथे बेबंदपणे चालू असलेला खाण व्यवसाय, बेदरकारपणे चालणारी अनिर्बंध खनिज वाहतूक तसेच कावरे बचाव आदिवासी संघटनेचे नेते नीलेश गावकर यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याला चार दिवस उलटूनही सरकारतर्फे कोणतीच हालचाल नाही. या सर्वांच्या निषेधार्थ आज (दि.१५) सकाळी शंभरहून अधिक कावरेवासीयांनी अकस्मात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मालभाट येथील निवासस्थानावर मोर्चा नेऊन आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शांततापूर्ण निदर्शने केली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेची अक्षरशः तारांबळ उडाली.
हल्लेखोरांना पकडण्यासाठी दिलेली चोवीस तासांची मुदत संपताक्षणी गावकर्‍यांनी सकाळी मुख्यमंत्र्याच्या निवासाकडे धाव घेतली यावरून एकंदर प्रकरणात तेथील रहिवाशांच्या भावना किती तीव्र बनलेल्या आहेत त्याची प्रचिती आली. यावेळी प्रामुख्याने महिलांची संख्या अधिक होती. त्या सर्वांच्या हातात त्यांच्या मागण्यांचे फलक होते व त्यात सरकार खाण माफियांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
बसमधून आलेले हे लोक प्रथम लोहिया मैदानाजवळ जमले. तेथे त्यांना चांदर, कुडतरी, नावेली, बाणावली येथील बिगरसरकारी संघटनांचे प्रतिनिधी येऊन मिळाले व नंतर तेथून हे सर्वजण मुख्यमंत्र्यांच्या निवासाकडे गेले. हा मोर्चा पूर्वघोषित नसल्याने निदर्शक थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासाकडे गेले. त्यांनी घोषणा दिल्या नव्हत्या तर ते मूकपणे चालत गेल्याने कोणालाच कल्पना आली नाही. तेथील सुरक्षा रक्षकाने मग पोलिस अधिकार्‍यांना निदर्शकांची कल्पना दिली व त्यानंतर पोलिस कुमक तेथे दाखल झाली. यावेळी पोलिस निरीक्षक संतोष देसाई, वाहतूक पोलिस निरीक्षक प्रबोध शिरवईकर तेथे दाखल झाले व त्यांनी नंतर आणखी पोलिस कुमक मागवून घेतली.
यावेळी पोलिस अधिकार्‍यांनी निदर्शकांची समजूत घातली व सुरक्षिततेच्या कारणास्तव मुख्यमंत्री निवासापासून थोडे दूरवर राहण्याची त्यांना विनंती केली. कावरेहून आलेल्या निदर्शक महिलांनी त्यांना विरोध केला व आपली निदर्शने शांततापूर्ण असताना सुरक्षिततेचा प्रश्‍नच कसा निर्माण होतो, सुरक्षिततेचाच मुद्दा असेल तर तेथे रस्त्यावर वाहने का उभी केलेली आहेत असे प्रश्‍न उपस्थित केले. पण नंतर निदर्शकासमवेत असलेले डॉ. ह्यूबर्ट गोमिश यांनी काही अंतरावर जाऊन उभे रहाण्याचे मान्य केले. त्यानंतर निदर्शक मागे हटले व काही अंतरावर जाऊन आपल्या मागण्यांचे फलक घेऊन उभे राहिले.
निरीक्षक संतोष देसाई यांनी समितीच्या नेत्यांशी बोलणी करून त्यांचे नेमके म्हणणे काय आहे ते विचारले असता, काही वेळानंतर इस्पितळातून नीलेशला घरी पाठविण्यात येणार आहे, त्यामुळे त्याला घेऊन आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार व संशयित हल्लेखोरांची नावे नीलेशला मुख्यमंत्र्यांना सांगायला सांगणार, असे त्यांनी सांगितले. संतोष देसाई यांनी त्यांचा निरोप मुख्यमंत्र्यांना कळविला व परत येऊन मुख्यमंत्री पंधरा मिनिटात एका उद्घाटन समारंभासाठी निघणार असून त्यापूर्वी एक पाच सदस्यीय शिष्टमंडळ त्यांना भेटायला जाऊ शकते व तेच चांगले होईल, असे सांगितले.
त्यानुसार दिलीप हेगडे, पार्वती वेळीप, सत्यवान वेळीप, अनिशी वेळीप व मनोज वेळीप यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नीलेश हल्लाप्रकरण पोलिसांकडून ज्या पद्धतीने हाताळले जात आहे, त्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व सांगितले की, नीलेशने संशयितांचा तपशील पोलिसांना दिलेला असतानाही अजून त्यांना पाचारण करून ओळख परेडही केली गेलेली नाही. यावरून राजकीय दडपणामुळेच पोलिस तपास होत नसावा असा आरोप त्यांनी केला. संशयित हल्लेखोरातील एक नावेली येथील तर दुसरा खारेबांद येथील असल्याचा दावा त्यांनी केला. उच्च न्यायालयाचे निर्बंध धुडकावून कावरेत खनिज उत्खनन व त्याची अनिर्बंध वाहतूक चालूच असून सरकारी यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. पार्वती वेळीप या महिलेने तर अशाप्रकारे एकेकट्याचे हातपाय मोडून घालण्याऐवजी अशा रितीने मोर्चा घेऊन आलेल्या सर्वांनाच मारून टाका म्हणजे विरोध करणारे कुणीच उरणार नाही अशी व्यथा पोटतिडकीने मांडली.
सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर मुख्यमंत्र्यांनी परवाना रद्द केलेली खाण खरोखरच बंद आहे की नाही त्याची खातरजमा करण्याचा आदेश आपण आजच दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांना देतो. तसेच तेथील सर्व यंत्रसामुग्री हटविण्यासाठी पावले उचलण्याची सूचना त्यांना करतो असे सांगितले. नीलेशवर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेत त्याला यापूर्वीच संरक्षण देण्यात आलेले असून हल्लेखोरांचा तपास पोलिस आपल्या पद्धतीने करीत आहेत. त्यांच्या कामात व्यत्यय आणणे आता उचित होणार नाही. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्या, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यातून काहीच साध्य झाले नाही तर पुढे पाहता येईल. कावरेत एकही खाण नको या लोकांच्या मागणीसाठी एक संयुक्त पाहणी समिती नेमली जाईल. ती गावात जाऊन लोकांचे म्हणणे ऐकून घेईल, असेही त्यांनी शिष्टमंडळाच्या सदस्यांना सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर विसंबून मग निदर्शक माघारी वळले. निदर्शकांबरोबर डॉ. गोमिश, श्री. हेगडे, ऑर्लन रॉड्रिगीस, पीटर व्हिएगश, जॉन कुडतरी, पंच शकुंतला पॉसियान कॉस्ता व सिद्धार्थ कारापूरकर आदी होते.
मोर्चाबाबत सुरुवातीस अनभिज्ञ असलेल्या पोलिसांनी नंतर चोख सुरक्षा व्यवस्था करताना दहशतवादविरोधी पथकाला व सशस्त्र पोलिस दलाच्या तुकडीला आणून तैनात केले. त्यामुळे मालभाटभागात आज निदर्शकांपेक्षा खाकीवर्दीधारी अधिक होते.

No comments: