नवी दिल्ली, द. २० : स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठा घोटाळा म्हणून गणना होत असलेल्या २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी तपासाचे तार आता द्रमुक नेते करुणानिधी यांच्या घरापर्यंत पोहोचले असून, करुणानिधी यांची कन्या कानिमोझीने जामिनासाठी केलेला अर्ज दिल्ली न्यायालयाने आज ङ्गेटाळून लावल्यानंतर कानिमोझीला अटक करण्यात आली असून, १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तिची ए. राजाला ठेवलेल्या तिहार कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
स्पेक्ट्रम घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता आरोपी साक्षीदारांना प्रभावित करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगत विशेष सीबीआय न्या. ओ. पी. सैनी यांनी कानिमोझीचा जामीन अर्ज ङ्गेटाळून लावला. करुणानिधी यांच्या रजथी नावाच्या दुसर्या पत्नीची मुलगी असलेली ४३ वर्षीय कानिमोझी न्यायालयाचा निर्णय ऐकताच अवाक् झाली. न्यायालयाने आपला निर्णय दिला त्यावेळी कानिमोझीच्या चेहेर्यावर शांत भाव असले तरी पोलिसांनी तिला लॉकअपमध्ये नेले त्यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू आले होते.
न्यायालयाच्या निर्णयानंतर पिवळा सलवार परिधान केलेल्या कानिमोझीला दिल्ली पोलिसांच्या वाहनातून तिहार कारागृहात नेण्यात आले. स्पेक्ट्रम घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार माजी केंद्रीय दूरसंचारमंत्री ए. राजालाही याच कारागृहात ठेवण्यात आले आहे. कानिमोझीसोबतच कलाईग्नार टीव्हीचा सीईओ शरदकुमार याने केलेला जामीन अर्जही न्यायालयाने ङ्गेटाळून लावला. शरदकुमारला अटक करण्यात आली असून त्याला चार क्रमांकाच्या जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
पतियाळा हाऊस न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्यावेळी कानिमोझीचे पती अरविंदन आणि द्रमुक संसदीय पक्षाचे प्रमुख टी. आर. बालू उपस्थित होते. महिला पोलिस कर्मचार्यांनी कानिमोझीला कारागृहात नेण्यापूर्वी तिच्या पतीने तिला दिलासा देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कानिमोझीला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे अवघड झाले होते. कानिमोझीला उद्या सकाळी १० वाजता पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
न्यायालयामुळेच गजाआड : भाजप
स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी द्रमुकनेत्या कानिमोझीला आज झालेल्या अटकेचे प्रमुख विरोधी पक्ष भाजपने स्वागत केले असून, या घोटाळ्याचा तपास सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली सुरू असल्यामुळेच कानिमोझीला अटक झाल्याचे म्हटले आहे. सीबीआयने २००८ मध्येच १३ महिन्यांपर्यंत या घोटाळ्याचा तपास केला होता. मात्र, त्यावेळी काहीही हाती लागले नव्हते. सुप्रीम कोर्टाने या तपासावर देखरेख ठेवत दर आठवड्यात प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश सीबीआयला दिल्यामुळेच या घोटाळ्याबाबत कारवाई होत असल्याचे दिसत आहे, असे भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी आजच्या घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.
आघाडीत बिघाडी नाही : कॉंग्रेस
स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी कानिमोझीला अटक झाल्यामुळे द्रमुकसोबतच्या आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असे संपुआतील प्रमुख पक्ष असलेल्या कॉंग्रेसने आज स्पष्ट केले आहे. हे प्रकरण आरोपी व्यक्ती आणि संबंधित न्यायालयाशी निगडित असल्याने न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर राजकीय पक्ष म्हणून वक्तव्य करणे योग्य ठरणार नाही. मात्र, आजच्या घडामोडींमुळे द्रमुकसोबतच्या आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असे पक्षप्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.
Saturday, 21 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment