Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 19 May, 2011

शिक्षण माध्यम प्रश्‍नावर उद्यापर्यंत तोडगा अपेक्षित

दिल्लीत आज बैठकीचा दुसरा टप्पा
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): प्राथमिक माध्यमप्रश्‍नी निर्माण झालेल्या वादावर आज (दि.१८) दिल्लीत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. दिल्लीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांच्यासमोर इंग्रजीची मागणी करणार्‍या नेत्यांनी आपली बाजू मांडली. उद्या १९ रोजी केंद्रीय मानव संसाधन मंत्री कपील सिब्बल यांच्याबरोबर बैठकीचा दुसरा टप्पा होणार असून परवा २० मेपर्यंत निर्णय अपेक्षित असल्याची माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी दिली.
प्राथमिक माध्यम मातृभाषेतूनच व्हावे असे सरकारी धोरण असताना कॉंग्रेस पक्षातील काही नेत्यांनी इंग्रजीसाठी आग्रह धरून सरकारला वेठीस धरल्याने सध्या हा विषय दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. विधानसभेत सरकारने याबाबत ठोस भूमिका घेऊनही सरकार पक्षातीलच काही नेत्यांनी या विषयावरून राजकीय पेचप्रसंग निर्माण केल्याने या विषयावर दिल्लीत तोडगा काढण्याचे ठरवण्यात आले आहे. आज दिल्लीत याप्रकरणी ऑस्कर फर्नांडिस यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीला इंग्रजीचा आग्रह धरणार्‍या ‘फोर्स’ संघटनेच्या नेत्यांनी आपली बाजू त्यांच्याकडे मांडली. या बैठकीला कॉंग्रेसतर्फे सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव, व्हिक्टोरिया फर्नांडिस, उपसभापती माविन गुदिन्हो आदी हजर होते. त्यांनीही इंग्रजीच्या बाजूने आपली बाजू मांडली.
दिल्लीत मातृभाषेच्या धोरणांत कोणताही बदल होता कामा नये, अशी भूमिका मांडण्यासाठी आमदार दयानंद नार्वेकर, मगोचे नेते तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर आदी नेते उपस्थित आहेत, अशी माहितीही मिळाली आहे. उद्या केंद्रीय मानव संसाधनमंत्री कपील सिब्बल यांच्याशी या दोन्ही गटांची बैठक होणार असून त्यानंतर दिल्लीतील नेते याबाबत अंतिम निर्णय घेतील. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर हे देखील या बैठकीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. २० मेपर्यंत याविषयावर अंतिम तोडगा निघेल, अशी अपेक्षा त्यांनी बाळगली.
मुख्यमंत्री दिगंबर कामत व शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडेही दिल्लीतील नेत्यांची चर्चा होणार असून ते सरकारची बाजू स्पष्ट करणार आहेत. या बैठकीसाठी कॉंग्रेसचे प्रभारी जगमितसिंग ब्रार हे देखील प्रामुख्याने हजर होते. भारतीय भाषा सुरक्षा मंचतर्फे या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला असून सध्याच्या धोरणांत कोणताही बदल करण्यास संघटनेने हरकत घेतली आहे. आता दिल्लीतील कॉंग्रेस नेते नेमकी काय भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments: