वास्को, दि. २४ (प्रतिनिधी): बुडत असलेल्या एका १२ वर्षीय मुलीला वाचवणारा तरुणच समुद्रात पडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना आज २४ रोजी वास्कोत घडली. सदर मुलगी समुद्रात बुडत असल्याचे नजरेस येताच तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना कुठ्ठाळी येथील सद्दाम हुसेन (२२) हा युवक सडा येथील समुद्रात पडून बेपत्ता झाला आहे.
मुरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगोरहील, वास्को येथील एक कुटुंब आज ‘जपानीझ गार्डन’खाली असलेल्या समुद्रात आंघोळ करण्यासाठी उतरले असता दुपारी २.४५ च्या सुमारास ही घटना घडली. सद्दाम हुसेन ‘जपानीझ गार्डन’च्या जवळ असलेल्या ‘एम.पी.टी.’ च्या मलनिस्सारण प्रकल्पात काम करत असून आज दुपारी तो आपल्या अन्य तीन मित्रांबरोबर येथील समुद्रकिनार्यावर गेला होता. यावेळी त्याला एक मुलगी समुद्रात बुडत असल्याचे दिसले. त्याने लगेचच तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. समुद्रातील एका खडकावर चढून त्याने सदर मुलीला हात देऊन जवळ आणले. मात्र यावेळी त्याचाच तोल जाऊन तो पाण्यात पडला. नंतर येथे असलेल्या इतर लोकांनी सदर मुलीला समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढले.
दरम्यान, सदर घटनेची माहिती मुरगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन सद्दामचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फायदा झाला नाही. नंतर पोलिसांनी तटरक्षक दलाला तसेच अग्निशामक दलालाही पाचारण केले. दोन्ही पथकांनी त्याचा शोध घेतला. परंतु, उशिरा रात्रीपर्यंत तो सापडू शकला नव्हता. मुरगाव पोलिस स्थानकाचे हवालदार यशवंत मलिक्कार्जुन यांनी घटनेचा पंचनामा केला. निरीक्षक राजन निगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.
Monday, 25 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment