Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 26 April 2011

डिगणेत खाण वाहतूक रोखली!

पाळी दि., २५ (वार्ताहर): बेफाम खनिज मालाच्या वाहतुकीमुळे त्रस्त झालेल्या डिगणे येथील नागरिकांनी आपली व्यथा कुणीच ऐकत नाही म्हणून आज सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून साळगावकर, केणी, तिंबलो, फोमेंतो, सी. डी. एम., चौगुले, धेंपो आदी कंपन्यांची खनिज वाहतूक रोखून धरून आपला संताप व्यक्त केला.
सविस्तर माहितीनुसार, डिगणे येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांतील नागरिकांना धूळ प्रदूषणाचा जबरदस्त फटका बसत असून सततच्या धुळीमुळे येथील नागरिक त्रस्त बनले आहेत. या खनिज वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी व नुकसान भरपाईसाठी येथील नागरिकांनी अनेकवेळा खाण कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदने दिली. या निवेदनांच्या प्रती डिचोली मामलेदार, जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी त्याचप्रमाणे कुडणे सरपंचांना देऊन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही केला. परंतु, त्यांच्या कैफियतीकडे कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे शेवटी या संतप्त नागरिकांनी खाण वाहतूक रोखून धरून संबंधितांचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला.
सदर रस्ता रोखल्यामुळे होंडा ते डिगणेपर्यंत चक्का जाम झाला. ही बातमी समजताच साखळी पोलिस चौकीचे हवालदार हरिश्‍चंद्र परब पोलिस शिपायांसह दाखल झाले. थोड्या वेळाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी ‘वेदान्त’चे वाहतूक अधिकारीही आले असता आंदोलनकर्त्यांनी त्यांना वरिष्ठ अधिकार्‍यांशीच बोलणी करू असे सुनावले. सकाळी १०.३० वा. साखळी पोलिस चौकीचे हरिश्‍चंद्र परब यांनी सोनसी ते खोडगीणे हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिल्याने तुंबून राहिलेली वाहतूक काही अंशी मोकळी झाली. परंतु डिगणे ते वेळगे - पाळी या ठिकाणी होणारी खाण मातीची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
याच दरम्यान, कुडणेचेे सरपंच नवीन फाळकर यांनी आंदोलनकर्त्यांकडे दोन दिवसांची मूदत मागून घेतली व सर्व कंपन्यांच्या अधिकार्‍यांची, वाहतूक खात्याचे अधिकारी, पोलिस अधिकारी, मामलेदार, जिल्हाधिकारी यांची एक संयुक्त बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. मात्र याच वेळी सी.डी.एम. कंपनीच्या एका सुरक्षारक्षकाने आपल्या कंपनीच्या वाहन चालकांना आंदोलनकर्त्यांच्या अंगावरून गाड्या हाकण्याचे फर्मान दिल्याने वातावरण पुन्हा तंग बनले. दिलेले आश्‍वासन पूर्ण झाले नाही तर हे आंदोलन उग्र रूप धारण करून संपूर्ण कुडणे गावातील नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशारा देण्यात आला आहे.

No comments: