Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 30 April 2011

इंग्रजीचे अतिक्रमण हाणून पाडा

संमेलनाध्यक्ष सौ. मीना काकोडकर यांचा भीमटोला
सदाशिवगड कारवार येथे भारतीय
कोकणी संमेलनाचा थाटात शुभारंभ

काणकोण, दि. २९ (प्रतिनिधी): आपल्या मोगाळ कोकणीला इंग्रजीचा धोका निर्माण झाला असून तो निपटून काढण्यासाठी सर्व कोकणीप्रेमींनी कंबर कसली पाहिजे, असे आवाहन करतानाच देशातील वाढता भ्रष्टाचार, लाचलुचपत, गलिच्छपणा आणि अराजक याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कोकणी साहित्यिकांनी आपल्या लेखण्या परजाव्यात, असे प्रतिपादन सौ. मीना काकोडकर यांनी आज (शुक्रवारी) सदाशिवगड कारवार येथे केले.
कोकणी सांस्कृतिक मंडळा सदाशिवगड या संस्थेतर्फे आयोजित तीन दिवसांच्या अखिल भारतीय कोकणी संमेलनाच्या शुभारंभप्रसंगी संमेलनाध्यक्ष या नात्याने त्या बोलत होत्या. अत्यंत मंगलमय वातावरणात आणि विराट कोकणीप्रेमींच्या उपस्थितीत या सोहळ्याला सुरुवात झाली. उद्घाटन समारंभ थाटात पार पडला. विख्यात हिंदी साहित्यिक गिरिराज किशोर यांची खास उपस्थिती याप्रसंगी लाभली. माजी मंत्री प्रभाकर राणे, डॉ. एच. शांताराम, अशोक नाईक, गोकुळदास प्रभू, ऍड. रामकृष्ण नाईक, आर. एच. भास्कर, गंगाधर जांबावलीकर व मावळते अध्यक्ष रमेश वेळुस्कर अशी मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
इंग्रजीचे स्तोम सध्या नको तेवढे वाढत चालले आहे. त्यामुळे कोकणीसारख्या मधाळ भाषेला मोठाच धोका निर्माण झाला आहे. तो वेळीच ठेचून काढण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कोकणीप्रेमींना करायचे आहे, असे सौ. काकोडकर यांनी सांगितले. यावेळी संमेलनाचा सारा परिसर टाळ्यांच्या गजरात दुमदुमला... डॉ. गिरिराज किशोर यांनी कोकणीला उज्ज्वल भवितव्य असल्याचे ठळकपणे नमूद केले. डॉ. एच. शांताराम यांनी प्रास्ताविक केले. अशोक नाईक यांनी स्वागतपर भाषणात कारवार भागाने कोकणीच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाचा अभिमानपूर्वक आढावा घेतला. प्रभाकर राणे यांनी तर कोकणीच्या विकासाकरता कारवार परिसरात कोकणी दैनिक सुरू करण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांच्या या सूचनेला कोकणीप्रेमींनी जोरदार प्रतिसाद दिला.
मावळते अध्यक्ष श्री. वेळुस्कर यांनी संमेलनाध्यक्षाची सूत्रे सौ. काकोडकर यांच्याकडे सुपूर्द केली. संमेलनाचे औचित्य साधून कोकणी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. अरुण साखरदांडे (साहित्य), सौ. कस्तुरी देसाई (अनुवाद), प्रकाश पर्येकर (बालसाहित्य) व अलका सिनाय अस्नोडकर यांचा भावपूर्ण गौरव करण्यात आला. याप्रसंगी पाच कोकणी पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कोकणी संमेलनाची स्मरणिका व साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांच्या कॅलेंडरचे पुनःप्रकाशन करण्यात आले. अनंत अग्नी यांनी सूत्रसंचालन केले.
क्षणचित्रे
- संमेलनाला देशभरातील कोकणीप्रेमींचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
- वाद्यांच्या मंगल सुरावटीमुळे सारे वातावरण भारल्याचे चित्र दिसत होते.
- वक्त्यांनी केलेल्या महत्त्वाच्या सूचनांवर टाळ्यांचा गजर होत होता.
- संमेलनावर गोव्यातील शिक्षण माध्यमाच्या मुद्याचा प्रभाव प्रकर्षाने जाणवला.

No comments: