Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 27 April 2011

मडगावातील सोनाराला साडेअठरा लाखांना गंडवले

टोळी पसार - ‘डील’ करून देणारा अटकेत
म्हापसा, दि. २६ (प्रतिनिधी): आपण सोन्याचांदीचे व्यापारी आहोत अशी बतावणी करून मडगाव येथील दिलीप वेर्णेकर या सोनाराला तब्बल साडे अठरा लाख रुपयांचा गंडा घालून एक सराईत टोळी आज पसार झाली आहे. दरम्यान, या भामट्यांशी वेर्णेकर यांचे ‘डील’ करून देणार्‍या मूळ कारवार येथील व सध्या मडगाव येथे राहणार्‍या जगदीप गोवेकर यांना मडगावात अटक करण्यात आली आहे.
सविस्तर माहितीनुसार, काही माणसांकडे उत्तम प्रतीचे सोने विक्रीस आहे असे जगदीप यांनी मडगावातील दिलीप वेर्णेकर यांना सांगितले. आज श्री. वेर्णेकर यासंबंधीचे व्यवहार करण्यासाठी करासवाडा येथील एका धाब्यावर आले असता त्या टोळीतील एकाने आपल्याकडील सोन्याचा नमुना त्यांना दाखवला. वेर्णेकर यांना तो पसंत पडला. सोने गाडीत आहे, तुम्ही पैसे द्या, असे सांगून त्याने वेर्णेकरांकडून साडे अठरा लाख रुपये घेतले. त्यानंतर ते गाडीकडे जात असतानाच एक स्कॉर्पियो गाडी सुसाट वेगाने त्यांच्यापाशी आली. त्यातून काही माणसे खाली उतरली व त्यांनी वेर्णेकरांशी व्यवहार करणार्‍याला मारहाण करण्याची बतावणी केली. त्यानंतर त्या इसमाला गाडीत कोंबून ते पसार झाले. दरम्यान, या सर्व प्रकारात कुठलीही इजा न पोचलेल्या वेर्णेकरांना या प्रकरणाचा संशय आला व त्यांनी त्वरित म्हापसा पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यावरून या टोळीशी वेर्णेकरांचे ‘डील’ करून दिलेल्या जगदीप गोवेकर याला मडगावात अटक करण्यात आली आहे. उपनिरीक्षक नितीन हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

No comments: