Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 30 April 2011

मगोचे बहुतांश केंद्रीय सदस्य भाजपशी युतीबाबत अनुकूल

कॉंग्रेसकडून सत्तेसाठी फक्त वापर झाल्याच्या प्रतिक्रिया
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): मगोचे आमदार तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर व आमदार दीपक ढवळीकर यांच्या विरोधातील अपात्रता याचिका अजूनही सभापती प्रतापसिंग राणे यांच्याकडे प्रलंबित आहे व त्यामुळेच या परिस्थितीत ते कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. मात्र, भाजपतर्फे सादर करण्यात आलेल्या युतीच्या प्रस्तावाबाबत केंद्रीय समितीचे अधिकतर सदस्य अनुकूल आहेत व त्यामुळे युतीबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘भाजप - मगो युतीत कॉंग्रेसचा कोलदांडा’ या वृत्तामुळे आज राजकीय गोटात एकच खळबळ उडाली. भाजप-मगो युती होऊ नये यासाठी कॉंग्रेसने आपले बळ पणाला लावलेले असले तरी, वविध भागांतील मगोच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांशी संपर्क साधून या विषयी आपली प्रतिक्रिया दिल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. बहुतांश मगो कार्यकर्ते युतीसाठी अनुकूल असल्याची खबर असून भाजपकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाचा पक्षाने गंभीरपणे विचार करावा, अशी इच्छा त्यांनी वर्तविली आहे. मगोचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर कॉंग्रेसने केवळ सत्तेसाठी मगोचा वापर केला हे कुणीही नाकारू शकत नाही. केवळ पक्षाचे अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी सत्तेत सामील होणे अपरिहार्य होते व त्यामुळेच हा पक्ष कॉंग्रेस आघाडीत सहभागी झाला, अशी माहिती पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली. आगामी विधानसभा निवडणुकीतही केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठीच कॉंग्रेस मगोचा वापर करण्याच्या तयारीत आहे. मगोला आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर कॉंग्रेसच्या या आमिषांना अजिबात बळी पडता कामा नये, अशी प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त करण्यात आली. भाजपची विचारसरणी मगोच्या विचारसरणीशी जवळीक साधणारी आहे व त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप व मगोची युती होणे गरजेचे आहे, असेही मत या नेत्याने व्यक्त केले.
दरम्यान, कॉंग्रेसकडून मगोच्या केंद्रीय समितीच्या काही सदस्यांना आमिषे दाखवली जात असली तरी समितीचे अनेक सदस्य भाजपशी युती करण्यास उत्सुक आहेत. भाजपच्या नेत्यांनी युतीबाबतचा प्रस्ताव जाहीर केल्यानंतर त्याबाबत बैठकीत चर्चाही झाल्याची खबर असून फक्त या प्रकरणी घाईगडबड न करता योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्यावर सर्वांचे एकमत झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

No comments: