Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 29 April, 2011

पत्रकारितेतील मानदंड हरपला

• विष्णू सूर्या वाघ
गोमंतकीय पत्रकारितेची परंपरा फार मोठी आहे. डॉ. टी. बी. कुन्हा, भारतकार हेगडे देसाई यांच्यासारख्या लढाऊ पत्रकारांनी तिचा पाया घातला. बा. द. सातोस्कर, द्वा. भ. कर्णिक, माधवराव गडकरी, लक्ष्मीकांत बोरकर, चंद्रकांत केणी, सीताराम टेंगसे, वामन राधाकृष्ण, तुकाराम पोेकजे, दत्ता सराफ, लक्ष्मण जोशी, सुरेश वाळवे, अशा अनेक पत्रकारांनी तिला सौष्ठव प्राप्त करून दिले अन् गोमंतकीय पत्रकारितेला खर्‍या अर्थाने लोकाभिमुख बनवले. मात्र या पत्रकारितेला कळसापर्यंत पोहोचवण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते नारायण आठवले यांनी.
आजचे वर्तमानपत्र हे उद्याची रद्दी असते हा सर्वमान्य समज खोटा ठरवताना वर्तमानपत्र हे सामाजिक क्रांतीचे आणि बंडाचेही अग्रदूत ठरू शकते हे आठवले यांनी दाखवून दिले. त्यांच्या पत्रकारितेचा इतिहास संघर्षाने, भारलेला आहे. विद्यार्थी दशेपासूनच चळवळीची आवड असलेल्या आणि लेखणीची तलवार बनवून लोकांसाठी लिहिण्याची स्वप्ने पाहणार्‍या नारायणराव आठवलेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात जीव तोडून काम केले. त्यांचा पिंड समाजवादी वृत्तीचा होता. पण इतर समाजवाद्यांप्रमाणे मिळमिळीत लिहिणे आणि मुळमुळीत बोलणे त्यांच्या स्वभावात नव्हते. वाणी आणि लेखणी दोन्हींचे फटकारे ते सारख्याच जोरकसपणे मारत होते.
कुठल्यातरी कारणावरून अत्र्यांशी त्यांचा वाद झाला आणि भर सभेत अत्रे बोलत असताना आपले पायताण त्यांनी अत्र्यांच्या दिशेने फेकून दिले. तेव्हापासून नारायण आठवले हा पत्रकारितेमधला एक उर्मट टग्या आहे अशी प्रतिमा निर्माण केली गेली. एका अर्थाने ते खरेही होते. पण आठवलेंच्या टगेगिरीला तुकोबांच्या वाणीचे आणि ज्योतिबा फुलेंच्या लेखणीचे भरभक्कम अधिष्ठान होते. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा अशी त्यांची रोखठोक वृत्ती होती. पण कठीण वज्राला भेदत असतानाही या अवलियाचे काळीज माणुसकीच्या वेडाने भरले होते. अन्याय बघितला की ते पेटून उठायचे आणि दुःख पाहिले की वितळून जायचे. म्हणूनच एकीकडे पोर्तुगीज कवी कोमोईशविरुद्ध जनमत तयार करताना त्यांची लेखणी तलवार बनली आणि दुसरीकडे मूकबधिर मुलांचे गार्‍हाणे लोकांसमोर मांडून लोकविश्‍वास प्रतिष्ठान स्थापन करताना त्या लेखणीतून उसळलेल्या अश्रूंची फुले झाली. मडकईच्या होडी दुर्घटनेत बळी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांचे उद्ध्वस्त संसार आठवले यांनी उभे करून दिले आणि दुसरीकडे मराठी कोकणी भाषावादात राजकीय सत्तेपुढे दुर्बळ झालेल्या मराठीप्रेमींना लोकशक्तीचे अधिष्ठान मिळवून दिले. गोमंतकात संपादक म्हणून रुजू होण्यापूर्वी प्रभंजन या साप्ताहिकाचा संपादक म्हणून नाना आठवले, प्रबोधनकार ठाकरेंच्या जाज्ज्वल्य विचारांचा वारसाही चालवीत होते. १९७७ साली आणीबाणी लादण्यात आली. तेव्हा इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीविरुद्ध लढा देण्यासाठी सुरुवातीला जी मंडळी पुढे आली त्यात नानाच आघाडीवर होते. इंदिराजींनी लादलेल्या सेन्सॉरशिपला चोख उत्तर देताना प्रभंजनच्या मुखपृष्ठावर,
‘पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विजय असो!’
‘इंदिरा गांधी यांचा विजय असो!’
‘गांधी यांचा विजय असो!’
‘यांचा विजय असो!’
‘विजय असो!’
‘असो!’
असा क्रमाक्रमाने एकेक शब्द गाळत इंदिराजींची हुर्यो उडवण्याचा धाडसीबाणा त्यांनी त्यावेळी गाजवला होता.
दै. गोमंतकच्या प्रारंभीच्या कालखंडात बा. द. सातोस्कर यांच्यानंतर संपादक पदाची धुरा माधवराव गडकरी यांनी पत्करली. गडकरी हे स्वतंत्र गोव्याने पाहिलेले पहिले लोकाभिमुख पत्रकार. त्यांच्यानंतर नारायण आठवले यांनी लोकांत मिसळणारा संपादक कसा असतो हे गोव्याला दाखवून दिले. सुरुवातीला ते गोव्यात आले. तेव्हा फारसे कोणी त्यांना ओळखत नव्हते. केसांची जुल्फे कपाळावर आलेला, पानाने ओठ रंगवणारा, भेदक नजरेने समोरच्याच्या काळजाचा ठाव घेणारा, सहसा सफारीमध्ये वावरणारा हा तुंदिलतनू संपादक गोमंतकमध्ये आल्यावर लेखणीइतकीच आपली जीभही सराईतपणे चालवू लागला. कोणाचाही मुलाहिजा न ठेवणारा पत्रकार म्हणून त्यांची ओळख झाली. भ्रष्ट राजकारण्यांचे बुरखे टराटरा फाडणारा संपादक म्हणून ते प्रस्थापित झाले. संपादकीयांची शैली त्यांनी बदलून टाकली. आठवलेंचे संपादकीय हे खर्‍या अर्थाने जनमताचे प्रतिबिंब होते. कारण त्यातून लोकभाषेचे यथार्थ दर्शन होत होते. अग्रलेखांना सणसणीत मथळे देणे हा त्यांचा डाव्या हाताचा खेळ होता. त्यांच्या एकेका मथळ्याने अनेकदा राजकारणी गारद होत. त्याचबरोबर अनिरुद्ध पुनर्वसूपासून संपादकीय पानावरच्या आठव्या कॉलममध्ये आठवा स्तंभ लिहायचे तेव्हा अत्यंत मनस्वी, हळुवार आणि भावुकही व्हायचे.
गोमंतकभवनमधील चौथ्या मजल्यावरील त्यांच्या खोलीत खिडकीपाशी येणारे कावळे, चिमण्या, खारोट्या, मांजरी, त्यांच्या लेखांचे विषय बनायचे. चालू घडामोडीवर ओवीबद्ध छंदातून रविवार गाथा लिहिताना ते नारायण महाराज बनायचे. गोमंतक सोडल्यानंतर अनेक वर्षे चित्रलेखा साप्ताहिकातून महाराष्ट्र माझा हे सदर त्यांनी चालवले. त्यातही आपला लढाऊ बाणा त्यांनी कधी सोडला नाही. याच चित्रलेखात सख्याहरी बनून अत्यंत मिस्कील शैलीत सामाजिक घडामोडींवर भाष्य करण्याची हातोटी, त्यांनी आत्मसात केली होती. पत्रकारितेशिवाय कथा, कादंबरी, असे साहित्यप्रकारही त्यांनी हाताळले. साहित्यातील त्यांचे सर्व लिखाण अनिरुद्ध पुनर्वसू याच नावाने होत असे. त्यांच्या कादंबर्‍यांनी एकेकाळी ना. सी. फडके यांच्याप्रमाणेच तरुणवर्गाला वेड लावले होते. महात्मा फुलेंच्या जीवनावर त्यांनी लिहिलेली प्रभंजन ही कादंबरी त्यांच्या साहित्य संभाराचा मुकुटमणी ठरावी इतकी परिपूर्ण आणि शैलीदार आहे. नाना मध्यंतरी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येऊन लोकसभही गेले. मात्र राजकारण हा त्यांचा पिंड नव्हता. ते जन्मजात पत्रकार होते. फक्त पत्रकारच नव्हे तर पत्रकारांची कार्यशाळा होती. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी, ज्ञानेश महाराव, यांच्यासारखे अनेकजण लिहिते झाले. नानांनी गोव्यासाठी खूप काही दिले आहे. लोकविश्‍वास प्रतिष्ठान गोमंतक मराठी अकादमी, यासारख्या संस्था त्यांच्या पुढाकाराने निर्माण झाल्या. मराठी चळवळीसाठी झोळी घेऊन लोकांमध्ये जात त्यांनी निधी जमवला. आठवलेंनी साद घातली आणि गोमंतकीयांनी प्रतिसाद दिला नाही असे क्वचितच घडले असेल. गोमंतकीय वाचकांनीही त्यांच्यावर मनापासून प्रेम केले. गोव्यामधील आपल्या वास्तव्यात नारायण आठवले आणि अनुराधा आठवले या दाम्पत्याने खूप काही दिले. वाचकाला बाणेदार बनवले. लढवय्यांची एक नवी पिढी निर्माण केली. गोव्याच्या अस्तित्वासाठी लढा देणारे जे अनेक घटक आज आपल्याला दिसतात त्यांच्या जडणघडणीत आठवलेंचा वाटा फार मोठा आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारितेचे नुकसान तर झालेच आहे पण गोवेकरांच्या गोयकारपणाला दिशा दाखवणारा ताठ कण्याचा दीपस्तंभ आज कोलमडून पडला आहे. नारायण सुर्वे यांच्यानंतर शब्दांच्या अंगणातला हा दुसरा नारायण. त्यांच्या मावळण्याने विषण्णतेचा अंधार माझ्याच नव्हे तर हजारोंच्या मनात दाटून आला आहे. नानांची प्रेरणा आम्हांला सदैव वाट दाखवत राहो हीच याक्षणी प्रार्थना.

1 comment:

Unknown said...

We are uhe solid first platform for modeling newcomers to achieve there new dreams. The first to train and promote out models at our expense to avoid burden on them. Join the most popular agency if you modelling jobs in Delhi for female freshers, models, students, housewives aiming to start there modeling career. We are top modelling agency in Delhi offering modelling jobs in Delhi for upcoming female freshers or experienced models who want to join lingerie modeling agencies.


modeling agencies in Delhi
modeling agencies
modeling jobs
modeling auditions
model coordinators
modeling jobs in Delhi