Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 29 April, 2011

भाजप-मगो युतीत कॉंग्रेसचा कोलदांडा

• कॉंग्रेसविरोधी मतांचे विभाजन करण्याची चाल
• मगोने निवडणूक स्वबळावर लढवण्याचे आवाहन

पणजी, दि.२८(प्रतिनिधी): भाजप व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची युती कोणत्याही परिस्थितीत होता कामा नये यासाठी आता कॉंग्रेसतर्फे जोरदार प्रयत्न सुरू झाले असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. म. गो पक्षाच्या केंद्रीय समितीच्या काही पदाधिकार्‍यांना हाताशी धरून या युती संदर्भातील बेत उधळून लावण्याचा कट काही कॉंग्रेस नेत्यांनी आखला आहे, अशी माहिती एका ज्येष्ठ पदाधिकार्‍याने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे.
भाजपचे केंद्रीय निवडणूक प्रभारी गोपीनाथ मुंडे व प्रभारी आरती मेहरा यांनी म. गो. पक्षाकडे युती करण्यासंदर्भात जाहीर वक्तव्य केल्याने कॉंग्रेस गोटात अस्वस्थता पसरली आहे. भाजप व म. गो. ची युती कॉंग्रेससाठी धोकादायक ठरू शकते याचा अंदाज कॉंग्रेस नेत्यांना आल्याने त्यांनी या युतीला अपशकून करण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. म. गो.चे नेते तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर व कदंब महामंडळाचे अध्यक्ष आमदार दीपक ढवळीकर यांना कॉंग्रेस आघाडीत स्थान देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या एका वजनदार मंत्र्याने ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत म. गो. पक्षाच्या सिंह चिन्हाचा वापर करून कॉंग्रेसविरोधी मतांचे विभाजन करण्याची व्यूहरचना या नेत्याने आखली आहे. या व्यूहरचनेत सुदिन व दीपक या ढवळीकर बंधूंना आपापल्या मतदारसंघात सुरक्षित वातावरण तयार केले जाईल, असेही कळते. या दोन्ही बंधूंच्या विरोधात कमजोर उमेदवार उभे करून त्यांना निवडून येण्यास मदत करण्याची हमी देण्यात आल्याचीही खबर आहे.
पुढील विधानसभा निवडणूक म. गो. पक्षाने स्वबळावर लढवावी, अशी योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत भाजपचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात म. गो. च्या चिन्हांवर काही प्रबळ उमेदवार उतरवून भाजप मतांचे विभाजन करण्याचा बेत या नेत्यांनी आखला आहे. म. गो. च्या या उमेदवारांचे ‘फडिंग’ करण्याची तयारीही सदर नेत्याने दर्शवली आहे. दरम्यान, या योजनेची माहिती ढवळीकरबंधुंनाही करून देण्यात आल्याने भाजपचा युतीचा प्रस्ताव बारगळल्यात जमा आहे.
सध्या युतीचा विचारही नाहीः सुदिन ढवळीकर
आपण विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारचा घटक आहे व त्यामुळे भाजपबरोबर युतीचा विचारही आपल्या मनात येऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. भाजपकडून युतीबाबत व्यक्त झालेल्या प्रस्तावाबाबत आपण अधिक काही बोलू इच्छित नाही, असे म्हणून त्यांनी या विषयाला बगल देणेच पसंत केले.

No comments: