Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 27 April 2011

मगोला युतीचा जाहीर प्रस्ताव

पर्वरीतून विधानसभा निवडणूक लढवणार?
सर्वांना विश्‍वासात घेऊनच निर्णय

पणजी, दि. २६ (किशोर नाईक गांवकर): आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह बहुतांश भाजप कार्यकर्ते व जनतेकडून होत आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत पर्वरी या उत्तर गोव्यातील नव्या मतदारसंघाची भर पडली आहे. हा पूर्णपणे नवा मतदारसंघ आहे व त्यामुळे आपण पर्वरी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी, असा हट्ट कार्यकर्त्यांनी धरला आहे. कार्यकर्ते व जनतेच्या मताचा आदर ठेवून याबाबत केंद्रीय नेते व स्थानिक पदाधिकार्‍यांशी चर्चा करून नंतरच अंतिम निर्णय घेणार, असा खुलासा खासदार श्रीपाद नाईक यांनी केला.
खासदार श्रीपाद नाईक यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याबाबत जी चर्चा सुरू आहे, त्याबाबत त्यांनी मनमोकळेपणाने खुलासा केला. २००२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपण खासदार असताना विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव आला होता. यावेळी आपण विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत आपण काही फरकाने पराभूत झालो असलो तरी भाजपचे सरकार आले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपकडेच सत्ता येईल, असा विश्‍वास श्रीपाद नाईक यांनी बोलून दाखवला. भ्रष्ट कॉंग्रेसच्या राजवटीतून गोव्याची मुक्तता करण्याची मोठी जबाबदारी आता गोमंतकीयांच्या खांद्यावर आहे व ही जबाबदारी पेलण्यासाठी जनता सज्ज बनली आहे. सत्तेचा वापर करून कमवलेल्या पैशांव्दारे मते विकत घेऊन पुन्हा एकदा सत्तासिंहासनावर आरूढ होण्याचा कॉंग्रेसचा बेत यंदा धुळीस मिळणार आहे. पणजी महानगरपालिकेत याचा अनुभव आला आहे. महापालिकेतील सर्वच जागा आपण जिंकणार व विरोधकांची अनामत जप्त करणार, अशी फुशारकी मारणार्‍या नेत्यांचा डाव धुळीस मिळाल्याचे गोमंतकीयांनी पाहिले आहे. पणजी महापालिकेतील निवडणुकीत पहिल्यांदाच बिगर सरकारी संस्था व जागृत नागरिक एकत्र आले. अशा पद्धतीने विधानसभा निवडणुकीतही या लोकांनी पुढाकार घेऊन भ्रष्ट नेत्यांना घरी पाठवण्यासाठी कंबर कसली तरच गोवा खर्‍या अर्थाने मुक्त होईल, असेही श्रीपाद नाईक म्हणाले.
राज्याचे शिक्षणमंत्री बेहिशेबी पैसा विदेशात नेताना कस्टम्सच्या ताब्यात सापडले; पण मुख्यमंत्र्यांना मात्र त्याचे कोणतेही सोयरसुतक नाही. आपल्या सरकारची जनतेप्रतीची विश्‍वासार्हता टिकवण्याची जबाबदारी सरकारच्या नेत्यावर असते. पण ती जबाबदारीच मुख्यमंत्री विसरले आहेत, असेच खेदाने म्हणावे लागते असेही श्री. नाईक यांनी सांगितले.
आमदारांच्या बंडाबाबतची वृत्ते तथ्यहीन
पेडणे व काणकोण तालुक्यातील दोन मतदारसंघ रद्द झाले आहेत. हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडेच आहेत. त्यामुळे या आमदारांना अन्य ठिकाणी सामावून घेता येईल काय, याचा विचार पक्ष जरूर करेल. भाजप हा कॅडर आधारीत पक्ष आहे. पक्ष संघटना व कार्यकर्त्यांच्या बळावरच आपण निवडून येतो याचे भान प्रत्येकाला आहे व त्यामुळे काही आमदारांच्या बंडाबाबत जे वृत्त पसरवले जाते त्यात अजिबात तथ्य नाही, असेही श्रीपाद नाईक म्हणाले. या आमदारांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन केले जाणार असून त्यांचा मान त्यांना दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपमध्ये पक्षाला प्रथम स्थान आहे. आत्तापर्यंत भाजपच्या अनेक आमदारांना वेगवेगळ्या ‘ऑफर्स’ आल्या पण त्यांनी त्या फेटाळून लावल्या. यावरूनच पक्षाप्रति त्यांची निष्ठा दिसून येते. सत्ताधारी पक्षाकडून विनाकारण या आमदारांच्या बंडाचे वृत्त पसरवले जाते व ते पूर्णपणे निराधार आहे, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

No comments: