Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 27 April 2011

भ्रष्टाचाराविरोधात एकत्र या : स्वामी रामदेव

म्हापसा, दि. २६ (प्रतिनिधी): भारतातील अनेकांनी विदेशात मोठ्या प्रमाणात काळे धन साठवून ठेवले आहे. जोपर्यंत परदेशात असलेले हे धन बेकायदा असल्याचे सरकार जाहीर करत नाही व ही देशवासीयांची मालमत्ता देशात आणत नाही, तोपर्यंत ‘स्वाभिमाना’चा हा लढा सुरूच राहील. त्यासाठी येत्या ४ जून रोजी दिल्ली येथे सत्याग्रह केला जाणार असून त्यामध्ये संपूर्ण भारतातील देशप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन योगगुरु स्वामी रामदेवबाबा यांनी केले.
येथील श्री बोडगेश्‍वर मैदानावर आज सकाळी पार पडलेल्या योग शिबिरानंतर स्वामी बोलत होते. उपस्थितांना योगाचे धडे दिल्यानंतर रामदेव बाबांनी पत्रकारांशी मुक्त संवादसाधला. देशाला पडलेला भ्रष्टाचाराचा विळखा अधिकाधिक घट्ट होत चालला आहे. या रोगाला समूळ निपटून काढण्यासाठी माणसाच्या जीवनात एकाग्रता व विनम्रता येण्याची गरज आहे. सर्वजण एकत्र आले तर भ्रष्टाचाराचा बिमोड करणे कठीण नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी गोव्यात चाललेल्या अनिर्बंध खनिज उत्खननाविषयी पत्रकारांनी छेडले असता स्वामी म्हणाले, हा प्रश्‍न संपूर्ण देशाला सतावत असून तेथेही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार माजला आहे. जोपर्यंत आम्ही सर्व शक्तीनिशी या प्रकाराला विरोध करत नाही तोपर्यंत अशा लोकांना चाप लावता येणार नाही. देशातील भ्रष्टाचाराची कीड ठेचून काढण्यासाठी आणि स्वत:चे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योग शिबिरांत सामील व्हा, अभ्यासपूर्वक योग करा, तणावमुक्त जीवन जगा, सर्वांना सहकार्य करा, एकत्र येऊन लढा द्या, असे आवाहन रामदेव बाबांनी केले.
आज पहाटे ५ वाजता रामदेव बाबांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिर सुरू झाले. त्यामध्ये प्रतिष्ठित नागरिकांबरोबरच असंख्य लोकांनी सहभाग घेतला.

No comments: