Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 28 April, 2011

हक्क मिळेपर्यंत कावरेतून खाणवाहतूक नाही

• आदिवासी समितीचा इशारा
केपे, दि. २७ (वार्ताहर): कावरे परिसरातून होणार्‍या खनिज वाहतुकीमुळे येथील आदिवासी लोकांना आपल्या शेती-बागायतीवर पाणी सोडण्याची वेळ आलेली आहे. सदर बागायती टिकवून ठेवण्यासाठी कावरेवासीयांनी चालू केलेला लढा सुरूच राहणार आहे. जोपर्यंत आम्हांला आमचा हक्क मिळत नाही तोपर्यंत कावरेतून खनिज वाहतूक सुरू करू देणार नाही असा कडक इशारा कावरे आदिवासी बचाव समितीचे अध्यक्ष नीलेश गावकर यांनी कावरे येथे समितीने घेतलेल्या बैठकीत दिला.
आज सदर बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीला गोयच्या शेतकर्‍यांचो एकवोट, गोयच्या राखणदारांचो आवाज, कुडतरीचो एकवोट, युनायटेड फार्मर मोरपिर्ला, कोळंब बचाव समिती व इतर समित्यांचे सदस्य उपस्थित होते.
ही बैठक संध्याकाळी ५ वा. कावरे येथे सुरू झाली. बराच वेळ चाललेल्या या बैठकीचा लोकांत जागृती करणे हा मुख्य उद्देश होता. कावरेवासीयांनी सुरू केलेल्या आंदोलनाला लोकांचे सहकार्य मिळवणे हा प्रमुख उद्देश यामागे होता. बैठकीला सुमारे २०० ग्रामस्थ उपस्थित होते.
या बैठकीत पुढे बोलताना श्री. गावकर म्हणाले की, आम्ही सुरू केलेला हे आंदोलन अखेरपर्यंत चालू ठेवणार आहोत. त्याकरिता गावच्या लोकांचा व इतर राज्यांतील लोकांनीही सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. सरकारला सामान्य लोक दिसत नाहीत तर फक्त पैसा दिसतो असा आरोप यावेळी श्री. गावकर यांनी केला. या भागात आदिवासी लोक राहत नाहीत असा अहवालही पाठवण्यात आला असून या लहान समाजाचे सरकारला काहीच पडलेले नाही. आमच्या हक्काकरिता आम्हांला कोणतीही शिक्षा दिली तरी आम्ही आमच्या हक्काकरिता अखेरपर्यंत लढू असा निर्धार यावेळी गावकर यांनी व्यक्त केला.
बैठकीत बोलताना जॉन फर्नांडिस यांनी हा लढा पुढे लढण्यासाठी सर्वांनीच आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावे असे आवाहन केले. ही आमची भूमी आम्ही सांभाळून ठेवली नाही तर आमची पुढील पिढी आम्हांला शाप देईल. असे सांगत श्री. फर्नांडिस यांनी पैशांच्या मागे धावू नका. आमच्या पूर्वजांनी सांभाळलेली ही भूमी त्यांच्यासारखीच आम्हीही सांभाळायला हवी. आम्हांला संरक्षण हवे असेल तर दुसर्‍यावर अवलंबून राहू नका. तसेच मायनिंग मालकांच्या आमिषाला बळी पडू नका असे आवाहन यावेळी श्री. फर्नांडिस यांनी केले.
गोयच्या राखणदाराचो आवाजचे राजेंद्र काकोडकर यांनी सांगितले की, आपापसातील मतभेद विसरून एकत्र रहा. एकोपा सांभाळा. ध्येय घेऊन पुढे जा. आजवर जसे यश मिळाले आहे तसेच यश पुढेही मिळणार आहे. फक्त त्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. असे आवाहन केले.
शेतकर्‍यांचो एकवोटच्या झरिना डिकूना यावेळी, भूमीवर होणारा अत्याचार सहन करत बसू नका. आपण आपल्या जमिनी सांभाळल्या पाहिजेत. सत्य कधीच सोडू नका. कारण सत्याचाच नेहमी विजय होत असतो. असे प्रतिपादन केले.
यावेळी कोळंब बचाव समितीचे रामा वेळीप, महेश गावकर, तसेच इतर समित्यांच्या सदस्यांनीही आपले विचार व्यक्त केले.
दरम्यान, सदर बैठक सुरू असताना ६ वा. अचानक सुकेकर्णा येथून तिंबलो मायनिंगचा एक ट्रक खनिज माल घेऊन रिवण भागातून जाण्याऐवजी कावरे भागातून येत होता. सदर ट्रक स्थानिकांनी अडवला. चालकाकडे असलेली रिसीट काढून घेतली. कोणत्या कंपनीचा माल आहे ते पाहिले. ट्रकात १०.६०० टन माल होता. सदर ट्रक परत मागे पाठवला. या भागातून कोणत्याही परिस्थितीत खनिज वाहतूक करू देणार नसल्याचे ठणकावून सांगितले.

No comments: