Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 29 April, 2011

झुंजार पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक नारायण आठवले निवर्तले

मुंबई, दि. २८ : झुंजार पत्रकार, साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक आणि शिवसेनेचे माजी खासदार नारायण आठवले यांचे गुरुवारी वांद्रे येथील ‘साहित्य सहवास’ येथे त्यांच्या निवासस्थानी वार्धक्याने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, कन्या, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.
‘नाना’ या टोपणनावाने मित्रपरिवारात ओळखल्या जाणार्‍या नारायण आठवले यांच्या लेखनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे साधी, सोपी त्याचबरोबर आक्रमक शैली. वाचकाच्या काळजाला भिडणार्‍या लेखनशैलीमुळे ते सामान्य जनतेतही विलक्षण लोकप्रिय होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि गोवामुक्ती आंदोलनात त्यांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो. ‘गोमंतक’चे संपादकपद हा त्यांच्या पत्रकरितेतील सुवर्णकाळ ठरला. या काळात त्यांनी गोमंतक मराठी अकादमी आणि ‘लोकविश्‍वास प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना, मडकई होडी दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांना मदत असे सामाजिक बांधीलकी जपणारे कार्य केले. समाजसुधारणेच्या दृष्टीने त्यांचे लिखाण महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी राजकारणातही चांगलीच मुसंडी मारली. त्यामुळेच १९९६ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे सामाजिक कार्य आणि आक्रमक लेखन शैलीने प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांना लोकसभेचे तिकीट देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या निवडणुकीत आठवले विजयी झाले. त्यानंतर अठरा महिन्यांच्या खासदारकीच्या काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. मात्र राजकारणात त्यांचे मन ङ्गारसे रमले नाही, तिथले वातावरण त्यांना मनापासून भावले नाही. त्यामुळे नंतर त्यांनी राजकारणाची वाट सोडून लेखनाचीच कास धरली होती.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर त्यांनी प्रभंजन ही कादंबरी लिहिली. या कादंबरीच्या लेखनाबद्दल महाराष्ट्र सरकारने त्यांना सुवर्णपदक देऊन गौरवले होते. याखेरीज अन्य विपुल ग्रंथसंपदा त्यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीद्वारे प्रसवली. गोव्यातील सामाजिक जाणिवा आणि नेणीवा समृद्ध करण्याचे अलौकिक कार्य त्यांनी केले. मुंबईमध्ये ‘लोकसत्ता’त काम करत असताना त्यांना ‘गोमंतक’च्या संपादकपदाची ऑफर आली व त्यांनी ती त्वरित स्वीकारली. आता ते अनंताच्या यात्रेला निघून गेले आहेत. त्यांच्या निधनाने केवळ गोव्याच्याच नव्हे तर मुंबईतील पत्रकारिता आणि साहित्यिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
-----------------------------------------------------------
लढवय्या पत्रकार हरपलाः पर्रीकर
नारायण आठवले हे महाराष्ट्रातून आले खरे, पण काही वर्षांतच ते गोव्याचे होऊन गेले. आठवले यांनी नेहमीच गोव्याच्या हिताचा विचार प्रथम केला. त्यांनी पत्रकारिता करताना सामाजिक उपक्रमही हाती घेतले. त्यांची लेखणी परखड होती आणि सत्यही सांगणारी होती. सोप्या व साध्या शैलीत सडेतोड विचार मांडण्याची त्यांची पद्धत त्यावेळी संपूर्ण पिढीवर विशेषतः तरुणांवर प्रभाव टाकणारी ठरली, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी स्व. आठवले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
------------------------------------------------------------
कार्य अविस्मरणीय : मुख्यमंत्री
ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक नारायण आठवले यांचे गोव्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य गोमंतकीय कधीही विसरणार नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी स्व. आठवले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. परखड आणि स्पष्ट भाषाशैली हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते, असे श्री. कामत यांनी म्हटले आहे.

No comments: