Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 27 April 2011

कलमाडींना ८ दिवसांची सीबीआय कोठडी

नवी दिल्ली, दि. २६ : राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनात प्रचंड घोटाळे केल्याप्रकरणी अटकेत असणारे कॉंग्रेसचे माजी नेते आणि खासदार सुरेश कलमाडी यांना आज न्यायालयात सादर करण्यात आले असता त्यांना आठ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
त्यांच्यासोबतच अटक करण्यात आलेले आयोजन समितीचे दोन अधिकारी सुरजीत लाल आणि एस. एस. व्ही. प्रसाद यांनाही ४ मेपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. विशेष सीबीआय न्यायाधीश तलवंत सिंग यांनी हे आदेश दिले. सीबीआयने कलमाडी यांची १४ दिवसांची कोठडी मागितली होती. पण, न्यायाधीशांनी आठ दिवसांची कोठडी मंजूर केली.
आत्तापर्यंतच्या चौकशी प्रक्रियेत कलमाडींनी अजिबात सहकार्य केले नसल्याचे सीबीआयने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. एवढेच नव्हे तर ते आवश्यक माहिती दडपण्याचा प्रकार जाणीवपूर्वक करीत असल्याचेही सीबीआयने आरोप केले आहेत.
चप्पल भिरकावली
कॉंग्रेसमधून हकालपट्टीची नाचक्की झाल्यानंतर आज कोर्टाच्या आवारात कलमाडींना एका संतप्त नागरिकाच्या रोषालाही सामोरे जावे लागले. कपील ठाकूर नामक मध्यप्रदेशातील नागरिकाने कलमाडींवर चप्पल भिरकावत आपला संताप व्यक्त केला. सीबीआयच्या पटियाला विशेष न्यायालयात त्यांना हजर करण्यासाठी नेले जात असताना ठाकूर यांनी चप्पल ङ्गेकली. कलमाडी चालत असल्याने त्यांना चप्पल लागली नाही. पोलिसांनी लगेचच ठाकूर यांना ताब्यात घेतले.

No comments: