Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 27 April, 2011

गोव्यात पोर्तुगिजांचे नामोनिशाणही नको!

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर सिनारी कडाडले
पणजी, दि.२६ (प्रतिनिधी): पोर्तुगिजांनी गोव्याचा उद्धार केला व संस्कृती वाढवली अशी बेताल वक्तव्ये करणारे पोर्तुगालचे भारतातील राजदूत जॉर्ज रोजा द ऑलीवेरा हे भ्रमिष्ट झाले आहेत. तब्बल ४५० वर्षे गोमंतकीयांवर अमानुष अत्याचार करणार्‍या ‘मोंतेरो’, ‘जेरोम’ आदी पोर्तुगिजांची काळी कृत्ये गोव्यातील जनता अद्याप विसरलेली नाही. त्यामुळे पोर्तुगालच्या राजदूतांनी गोव्यात येऊन लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करणे हे हास्यास्पद आहे. या जुलमी पोर्तुगिजांचे गोव्यात नामोनिशाणही राहता उपयोगाचे नसून गोव्यात राहून पोर्तुगालचा उदोउदो करणार्‍या पोर्तुगीजधार्जिण्यांनी गोवा सोडून पोर्तुगालला जावे, असे सणसणीत प्रतिपादन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व निवृत्त पोलिस अधिकारी प्रभाकर सिनारी यांनी केले.
पोर्तुगालचे भारतातील राजदूत जॉर्ज रोजा द ऑलीवेरा यांनी रविवार दि. २४ एप्रिल रोजी गोव्यातील एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत, ‘गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकांना काय हवे आहे? ते पोर्तुगिजांच्या गोव्यातील कार्यक्रमांना विरोध का करतात? पोर्तुगिजांनी गोव्याचे भलेच केले आहे’ अशी वक्तव्ये केली आहेत. या वक्तव्यांवर स्वातंत्र्यसैनिक संघटनेने तीव्र आक्षेप घेतला असून त्या बाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी आज दि. २६ रोजी पणजी येथील स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर सिनारी बोलत होते. या प्रसंगी स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष नागेश करमली, सचिव चंद्रकांत पेडणेकर व खजिनदार कांता घाटवळ उपस्थित होते.
या प्रसंगी प्रभाकर सिनारींनी पोर्तुगाल राजदूतांच्या वक्तव्यावर तुफान हल्ला चढवला. पोर्तुगिजांचे गोडवे गाणार्‍या काही बाटग्या गोवेकरांमुळे गोव्यात आजही पोर्तुगिजांचे नाव शिल्लक आहे. हे त्वरित बंद व्हायला हवे. ज्यांना पोर्तुगिजांबद्दल प्रेम आहे व ज्यांनी पोर्तुगालचे पासपोर्ट घेतले आहेत त्यांनी तेथेच जाऊन कायमचे राहावे, असा सल्लाही श्री. सिनारी यांनी यावेळी दिला.
फुंदासांव ओरिएंट बंद करा : करमली
‘फुंदासांव ओरिएंट’ या पोर्तुगीज संस्थेमुळे राज्यात वारंवार पोर्तुगिजांच्या अत्याचारी कार्याचा उदोउदो होत असून ही संस्था बंद करण्याची तसेच राज्यातील अनेक रस्त्यांना व वास्तूंना दिलेली अत्याचारी पोर्तुगीज अधिकार्‍यांची नावे रद्द करण्याची जोरदार मागणी यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी केली. इंग्रजांनी देशावर पारतंत्र्य लादले व स्वातंत्र्यवीरांवर अत्याचार केले. पोर्तुगिजांनी याही पुढे जाऊन गोव्यातील देवदेवतांवर व धर्मावर आक्रमण केले. त्यासाठी त्यांनी हिंदूंची पवित्र मंदिरे तोडली, धर्मांतरासाठी अमानुषतेचा कहर केला. आणि एवढे सर्व करूनही त्याच देशाचे राजदूत आपण गोव्याचे भलेच केले असे सांगतात, ही तमाम गोमंतकीयांची क्रूर थट्टा आहे, असे ते म्हणाले. भारताने विज्ञान व तंत्रज्ञानात भरीव प्रगती केली असून ‘दरिद्री’ पोर्तुगालच्या कोणत्याही मदतीची भारताला व भारताचे अविभाज्य अंग असलेल्या गोव्याला गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.
--------------------------------------------------------------
राज्य सरकार कुचकामी
राज्यातील ‘फुंदासांव’सारख्या पोर्तुगिजांचे कार्यक्रम राबवणार्‍या संस्था बंद कराव्यात व राज्यातील रस्ते व इमारतींना दिलेली अत्याचारी पोर्तुगीज अधिकार्‍यांची नावे रद्द करावीत यासाठी पणजी महापालिकेला व केंद्र सरकारला पुन्हा नव्याने निवेदने देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी नागेश करमली यांनी दिली. राज्य सरकार कुचकामी असल्याने त्या सरकारला निवेदने देऊन काहीही होणार नाही असे, त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

No comments: