Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 30 April 2011

गोवा पोलिसांसाठी साकारतोय पाच कोटींचा नियंत्रण कक्ष

- ताबा महिला पोलिसांकडे
- पहिल्यांदाच जीपीएस यंत्रणा
- प्रत्येक सेकंदाची नोंद होणार

पणजी, दि. २९ (प्रीतेश देसाई): गोवा पोलिस खात्याचा अद्ययावत आणि पूर्णपणे संगणकीय प्रणालीवर चालणारा पोलिस नियंत्रण कक्ष साकारला जात असून या कक्षाचा ताबा महिला पोलिस पेलणार आहेत. या नियंत्रण कक्षाच्या निरीक्षकपदीही एक महिलाच असेल. सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून होऊ घातलेला हा पोलिस नियंत्रण कक्ष येत्या १५ मे रोजी सुरू होण्याची शक्यता आहे.
गोव्यातील नियंत्रण कक्षाच्या वाहनासाठी पहिल्यांदाच ‘जीपीएस’ यंत्रणा बसवली जाणार असल्यामुळे नयंत्रण कक्षाचे कोणते वाहन कुठे आहे याची माहिती दर सेकंदाला पणजीत बसलेल्या नियंत्रण कक्षाच्या अधिकार्‍यांना मिळणार आहे. प्रत्येक सेकंदाची नोंद या कक्षात ठेवली जाणार आहे. त्याचप्रमाणे, कोणतीही घटना घडल्यानंतर संबंधित पोलिस स्थानकाच्या पोलिसांनी तेथे जाऊन कोणती कारवाई केली, याचीही माहिती या नियंत्रण कक्षात नोंद होणार आहे. कक्षाच्या १०० क्रमांकावर फोन करून माहिती देणार्‍या व्यक्तीची नोंद आणि ती माहिती कक्षातून संबंधित पोलिस स्थानकाला पुरवलेल्या आवाजाचे ध्वनिमुद्रणही या ठिकाणी केले जाणार आहे.
या कक्षासाठी १ हजार २३ पोलिसांची गरज आहे. त्यासाठी राज्यातील विविध पोलिस स्थानकातील पोलिस शिपायांची निवड करण्यात आली आहे. तर, फोन घेण्यासाठी सात महिला पोलिसांची निवड करण्यात आली आहे. ज्या तरुणींना उत्तम इंग्रजीबरोबर कोकणी, मराठी, हिंदी भाषा बोलता येते अशांचीच यासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच, कन्नड येणार्‍याही महिला पोलिसांचीही तजवीज केली गेली आहे. प्रायोगिक तत्त्वावर या नियंत्रण कक्षाचे काम सुरूही झाले आहे. पणजी पोलिस स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर या वातानुकूलित नियंत्रण कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. आतमध्ये कानाला हेडफोन आणि समोर संगणक घेऊन महिला पोलिस नियंत्रण कक्षात येणार्‍या प्रत्येक फोनची नोंद करून घेतात. फोनवरून मिळणारी माहिती त्याचवेळी संगणकावर टाइप केली जाते. ही टाइप केलेली माहिती त्याचवेळी विभागणी कक्षात पाठवली जाते. या विभागातून ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्याच्या जवळ असलेल्या पोलिस स्थानकाला माहिती पुरवली जाते. हे सर्व घडत असतानाच पोलिस नियंत्रण कक्षाच्या वाहनालाही त्या ठिकाणी जाण्याचे आदेश दिले जातात. हे सर्व ५ मिनिटांच्या अवधीत केले जाते. कोणत्याही ठिकाणी कमीत कमी वेळात पोलिस पोचावेत हे या नियंत्रण कक्षाचे ध्येय असल्याचे सूत्रांनी सांगितले. मोबाईलवरून या कक्षात फोन करणार्‍या व्यक्तीचे नावही संगणकाच्या स्क्रीनवर झळकणार असल्यामुळे ‘ब्लॅन्क कॉल्स’ आणि ‘फेक बॉल्स’ करणार्‍यांना वचक बसणार आहे.
सध्या पोलिस नियंत्रण कक्षाकडे ३० जिप्सी वाहने असून त्यांची जागा आता ६० सुमो जीप घेणार आहे. ही वाहने दाखल झालेली आहेत. आता केवळ त्यांना चालक उपलब्ध होण्याचीच कमी राहिलेली आहे. तीही येत्या काही दिवसांत भरून काढली जाणार असल्याचा दावा सूत्राने केला. नियंत्रण कक्षाचा मुख्य ताबा रसायन शास्त्रात पदवीधर असलेले उपनिरीक्षक तेरेंझ वाझ सांभाळणार आहे. या नियंत्रण कक्षात आपत्कालीन व्यवस्थापनासाठी विशेष कक्षही तयार करण्यात आला आहे. याचा वापर पोलिस तसेच अग्निशमन दलही करू शकतात. त्या ठिकाणी एक मोठी स्क्रीन बसवण्यात आली असून त्यात राज्यातील रस्त्याची तसेच, अन्य संपूर्ण माहिती देणारा आराखडा झळकलेला आहे. अद्ययावत यंत्रणा असलेला हा कक्ष गोव्यात येणार्‍या पर्यटकांसाठी आणि अडचणीत सापडलेल्यांसाठी कितपत उपयोगी ठरतो हे येणारा काळच ठरवणार आहे.

No comments: