• नगरसेवकांकडून मुख्याधिकारी धारेवर
• सत्ताधारी-विरोधकांत शाब्दिक चकमकी
वास्को, दि. २९ (प्रतिनिधी): मुरगाव नगरपालिका मंडळाला विश्वासात न घेता आदर्शनगर येथील बेकायदा घरांवरील कारवाई पुढे ढकलणे, महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्या खारीवाडा येथील बेकायदा घराचा निरीक्षण अहवाल तयार करण्यास वेळकाढू धोरण अवलंबणे आदी आरोप करत नगरसेवकांनी मुख्याधिकारी मेघनाथ परोब यांना धारेवर धरले. शिवाय, सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांमध्ये खटके उडाल्याने नूतन मुख्याधिकार्यांची पहिलीच बैठक वादळी ठरली.
नगराध्यक्षा सौ. सुचिता शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता बैठक सुरू झाली. यावेळी नॅनी डिसोझा व सुदेश कोलगावकर वगळता इतर सर्व नगरसेवक उपस्थित होते. आदर्शनगर येथील खाजगी जागेत उभारण्यात आलेल्या ३३ बेकायदा बांधकामावरील कारवाई पालिका मंडळाला विश्वासात न घेता दोन आठवड्यांनी पुढे ढकलल्याने नगरसेवकांनी मुख्याधिकार्यांवर सुरुवातीपासूनच जोरदार हल्लाबोल केला. न्यायालयाने सदर बांधकामे बेकायदा ठरवल्यानंतर मुख्याधिकार्यांनी कोणतीही सल्लामसलत न करता घेतलेल्या निर्णयावर नगरसेवकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नगराध्यक्ष सुचिता शिरोडकर यांनी आपल्याला याची साधी कल्पना देण्यात आली नसल्याचे सांगितले. तर, नगरसेवक कार्लुस आल्मेदा, सैफुल्ला खान व तारा केरकर यांनी मुख्याधिकार्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. महसूलमंत्र्यांच्या दबावाखाली ते ही घरे वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सदर निर्णय कायदेशीररीत्या घेण्यात आल्याचा दावा करताच, नगरसेवकांनी याला तीव्र आक्षेप घेत नगराध्यक्षांना तरी विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे नजरेस आणून दिले. कारवाई पुढे ढकलताच एका घर मालकाने वरील न्यायालयात स्थगिती मिळवल्याचे नजरेस आणून देताना, अशा प्रत्येक खटल्यामागे कायदा सल्लागाराला ४० हजार शुल्कापोटी द्यावे लागत असल्याचे नगरसेवकांनी मुख्याधिकार्यांना सांगितले. दोन आठवड्यांत सर्व घर मालकांनी स्थगिती मिळवल्यास पालिकेला लाखो रुपयांचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मुख्याधिकार्यांनी मुदतवाढ मागे घेऊन त्या घरांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी उपनगराध्यक्ष मनेष आरोलकर यांनी केली.
बायणा किनार्याचा विकास व सौंदर्यीकरण करण्यासाठी नवीन आराखडा तयार करून तो पर्यटन विभागाला पाठवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जेटी - सडा येथे असलेल्या भारतीय अन्न महामंडळाने पालिका गोदामाच्या करवसुलीतून पावणे सहा लाख रुपये माफ करण्याची केलेली विनंती फेटाळण्यात आली. पालिकेला अंधारात ठेवून क्रीडा प्राधिकरणाने नॉन मॉन, खारीवाडा येथे सुरू केलेले कुंपणाचे काम लवकरात लवकर बंद करण्याचा आदेश संबंधित कंत्राटदाराला देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पालिका क्षेत्रातील सर्व प्रभागातील भटकी कुत्री सडा येथील प्रभाग १ मध्ये सोडण्यात येत असल्याच्या प्रकारावर नगरसेवक शेखर खडपकर यांनी तीव्र विरोध केला. या कुत्र्यांमुळे स्थानिकांना इजा झाल्यास त्याला पालिका जबाबदार असेल, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीत सत्ताधारी व विरोधी गटांतील नगरसेवकांत बर्याचदा शाब्दिक चकमकी उडाल्या. महसूलमंत्री डिसोझा यांचे बंधू पाश्कॉल यांच्यावर विविध आरोप करण्यात आले असता त्यांनी तारा केरकर यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे टिपणी केली. यावेळी संतप्त झालेल्या तारा केरकर यांनी त्या ठिकाणी असलेली बाटली फेकून मारण्याची धमकी दिली. यावेळी इतर नगरसेवकांनी पाश्कॉल यांना तारा यांची माफी मागण्याची सूचना केली असता त्यांनी ती धुडकावून लावली व आपल्या खुर्चीत गप्प बसून राहिले. पाश्कॉल यांनी सादर केलेले पत्र त्यांनी स्वतः वाचून दाखवावे, अशी मागणी कार्लुस आल्मेदा यांनी केला असता त्या दोघांमध्ये काही वेळ बाचाबाची झाली. आल्मेदा यांना अन्य काही नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने ते पुन्हा आसनस्थ झाले. विषयाची जाणीव नसताना कोणतेही आरोप करणारे पाश्कॉल अशिक्षित असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
-------------------------------------------------------------
रवींद्र भवनाचे काम रखडणार?
तीन वर्षांपूर्वी मुरगाव नगरपालिकेने बायणा येथे रवींद्र भवन उभारण्यासाठी राज्य सरकारला जागा दिली होती. बदल्यात कोमुनिदादची १० हजार चौ.मी. जागा देण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, या आश्वासनाची अद्याप पूर्तता न झाल्याने तसेच रवींद्र भवनाच्या बांधकामाची मुदत संपल्याने पुन्हा मुदतवाढ न देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सदर रवींद्र भवनाच्या बांधकामाजवळच चौपदरी रस्त्याचे बांधकाम होणार असल्याने त्याचा अंतिम अहवाल आल्यानंतरच रवींद्र भवनाला परवानगी देण्याचे निश्चित करण्यात आल्याने त्याचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Saturday, 30 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment