Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 27 July, 2010

४५० लीटर केरोसीन जप्त

मडगाव, दि. २६ (प्रतिनिधी): एका मालवाहू रिक्षातून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेले जाणारे सुमारे ४५० लीटर केरोसीन एका वृत्तपत्र छायाचित्रकाराच्या सतर्कतेमुळे आज पोलिसांनी पकडले.
जीए ०२ डी ९८८६ क्रमांकाच्या मालवाहू रिक्षात गॅलनमध्ये केरोसीन साठवण्यात आले होते, ते गॅलन ताडपत्रीने झाकण्यात आले होते. पत्रकार अरविंद टेंगसे यांनी सदर रिक्षा अडवून पोलिसांनी याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी चौकशी केली असता रिक्षाचालकाकडे कोणत्याच प्रकारची कागदपत्रे किंवा बिल आढळून आले नाही. रिक्षाचालकाने दिलेल्या माहितीवरून केरोसीनच्या ठोक विक्रेत्याला चौकशीसाठी पाचारण केले असता तीन फिरत्या विक्रेत्यांच्या नावे असलेली प्रत्येकी १६० लीटरची बिले सादर केली. परंतु, पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तो गडबडला. फिरत्या विक्रेत्यांना अशा प्रकारे गॅलनमधून नव्हे तर त्यांचे फिरते गाडे आणून केरोसीन दिले जाते, असे सांगितल्यावर त्या विक्रेत्याकडे काहीच उत्तर नव्हते. अखेर पोलिसांनी सदर रिक्षाचालकाविरुद्ध ज्वालाग्राही पदार्थांची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणी मामलेदारांशी संपर्क साधला असता त्यांनी संपूर्ण चौकशीचा आदेश देऊन उद्या सकाळी सुनावणी ठेवली आहे. सध्या असलेल्या विक्रेत्यांना पुरेसे केरोसीन मिळत नसताना सरकारने मडगावात आणखी १७ विक्रेत्यांना परवाने दिल्याचे यावेळी उघड झाले.

No comments: