Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 28 July, 2010

ड्रग माफिया व पोलिसांचे साटेलोटे प्रकरण संतप्त विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले

कामकाज तहकूब, तपास सीबीआयकडे सोपवा
'सीआयडी' अकार्यक्षम असल्याचा ठपका

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): ड्रग माफिया आणि पोलिस यांच्यातील साटेलोटे प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी अकार्यक्षम आणि निष्क्रिय अशा गुन्हा अन्वेषण विभागाकडून केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडे (सीबीआय) सोपविण्यात यावी अशी जोरदार मागणी करत विरोधकांनी आज विधानसभा दणाणून सोडली. या मागणीसाठी विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेतल्याने उडालेल्या गोंधळामुळे सभापती प्रतापसिंग राणे यांना सभागृहाचे कामकाज दुपारच्या सत्रापर्यंत तहकूब करावे लागले.
मांद्रेचे आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासाला विचारलेल्या एका तारांकित प्रश्नाच्या चर्चेवेळी हा प्रकार घडला. गुन्हा अन्वेषण विभागाने गेल्या तीन वर्षांत हाताळलेल्या प्रकरणांचा विषय प्रा. पार्सेकर यांनी उपस्थित केला होता. यातील अनेक प्रकरणात आरोपींची सुटका झाल्याची माहिती सभागृहात उघड होताच, विरोधक आक्रमक बनले. त्यांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या विश्वासाहर्तेबद्दलच सवाल उपस्थित केला. गेल्या तीन वर्षांत या विभागाला एकही केस जिंकता आली नाही यावरून या विभागाची अकार्यक्षमता सिद्ध होते, अशी बोचरी टीका पार्सेकर, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, दामू नाईक यांनी केली. तथापि, यातील बहुतेक केसेस मटक्यासंदर्भातील होत्या. साक्षीदार फिरले की केसेसवर परिणाम होतो. यातील काही प्रकरणांमध्ये पुरेसे सक्षीपुरावे उपलब्ध होऊ न शकल्याने ही प्रकरणे न्यायालयात उभी राहू शकली नाही, अशी बचावाची भूमिका मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी घेतली. मात्र विरोधकांनी मुख्यमंत्र्यांचे हे म्हणणे फेटाळून लावले.
जे लोक साध्या मटक्याच्या केसेस हाताळू शकत नाही ते अमली पदार्थ माफिया आणि पोलिसांचे साटेलोटे कसे काय शोधून काढणार? येथे खुद्द मंत्र्यांच्या मुलावरच ड्रग माफियांशी साटेलोटे असल्याचा आरोप आहे, अशावेळी हा विभाग गृहमंत्र्याच्या मुलाची कशी काय चौकशी करणार, असा सवाल प्रा. पार्सेकर यांनी केला.
अमली पदार्थ व्यापार आणि पोलिसांचे संबंध हे प्रकरण सीआयडीकडूनही तात्काळ काढून घेऊन ते सीबीआयकडे सोपवा, असा आग्रह विरोधकांनी धरला. एकामागोमाग एक सगळ्याच विरोधकांनी आपल्या जागेवर उठून ही मागणी करायला सुरुवात केली. मात्र मुख्यमंत्री आपल्याच जागेवर बसून असल्याचे पाहताच संतप्त विरोधकांनी घोषणा देतच सभापतींसमोरील मोकळ्या जागेत चाल केली. दामू नाईक यांनी प्रथम मोकळ्या जागेत धाव घेतली आणि इतरांनी नंतर त्यांचे अनुकरण केले. सभागृहात वाढता गदारोळ पाहून सभापती राणे यांनी विधानसभा दुपारी २.३० वाजेपर्यंत तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा करत सभागृह सोडले. आज प्रश्नोत्तराच्या तासाला बहुतांशप्रश्न गृहमंत्रालयाशी (पोलिस) संबंधित असल्याने अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी यावेळी गॅलरीत हजर होते.

No comments: