Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 26 July, 2010

कोकण रेल्वेची मुंबई-गोवा वाहतूक तिसऱ्या दिवशीही बंद

आजही पूर्ववत होणे अशक्य
मडगाव, दि. २५ (प्रतिनिधी) : कोकणात निवसर व रत्नागिरी दरम्यान अतिवृष्टीमुळे खचलेला रेल्वे मार्ग व काही ठिकाणी त्यावर पाणी भरल्यामुळे कोकण रेल्वेच्या गोवा- मुंबई मार्गावरील गाड्या आज सलग तिसऱ्या दिवशीही रद्द करण्यात आल्या व उद्याही ही वाहतूक सुरु होण्याची क ोणतीच शक्यता नाही. आज येथून रेल्वेचे आणखी एक मदत पथक तिकडे रवाना झाले आहे.
कोकण रेलेवेच्या येथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज कोकणकन्यासह सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या. तर मंगला एक्सप्रेस लोंढा बेळगावमार्गे वळविण्यात आली. लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या एकतर रद्द करण्यात आल्या आहेत वा लोंढा बेळगावमार्गे वळविल्या आहेत, पण मुंबईकडील गाड्या रद्द केल्या गेल्या आहेत. काल रत्नागिरीस अडकून पडलेल्या प्रवाशांची अन्य वाहनाने पुढील सोय करण्यात आली. अजून तेथे प्रवासी अडखळून होते व त्यांना जोधपूर एक्सप्रेस परत वळवून पाठवून दिले गेले.
या नैसर्गिक प्रकोपामुळे संपूर्ण कोकण रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे. रत्नागिरी व निवसर येथे दगड व मातीचा भराव टाकून रेल्वेमार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती कोकण रेल्वे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली. गोव्याहून अन्यत्र जाण्यासाठी तिकिटे आरक्षित केलेल्या प्रवाशांना त्यांचा परतावा सुरु केला आहे असे कोकण रेल्वेचे जनसंपर्कअधिकारी बबन घाटगे यांनी सांगितले. येथील कोकण रेल्वे स्टेशनवर मुंबई, पुणे व अन्यत्र जाणाऱ्या लोकांची गर्दी झाली होती. त्यांनी पैसे परत घेऊन बस मार्गे जाणे पसंत केले. दक्षिणेकडे मंगलोरकडील वाहतूक मात्र सुरळित असली तरी खबरदारीपोटी गाड्या संथ वेगाने जात आहेत, असेही सांगण्यात आले.

No comments: