Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 29 July, 2010

गृहमंत्र्यांच्या पुत्राला अटक का नाही?


विधानसभेत दाखल होताच मिकी पाशेको यांचा सवाल

पणजी, दि. २८(प्रतिनिधी)- नादिया तोरादो ही आपली कौटुंबिक मैत्रीण होती व तिच्या मृत्यूला आपण अजिबात जबाबदार नाही. आपण तिचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले ही गोष्ट मात्र खरी आहे. या प्रकरणात आपल्याला जाणीवपूर्वक गोवण्यात आले. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी राष्ट्रवादीच्या केंद्रीय नेतृत्वावर दबाव टाकून आपल्याला राजीनामा देण्यास भाग पाडले. आपल्याविरोधात कोणाचीही तक्रार नसताना नादिया मृत्युप्रकरणी आपणाला अटक करण्यात आली. गृहमंत्र्यांच्या पुत्राचा ड्रग प्रकरणात सहभाग असल्याचे वृत्त सर्व राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय प्रसिद्धिमाध्यमांवर गाजत असताना या मंत्रिपुत्राला अजूनही अटक का होत नाही, असा खडा सवाल माजी पर्यटनमंत्री तथा बाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांनी आज विधानसभेत केला.
मिकी पाशेको यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आज ते पहिल्यांदाच विधानसभा अधिवेशनाला सभागृहात उपस्थित राहिले. आपल्यासंबंधी घडलेल्या प्रकाराबाबत आपल्याला खुलासा करावयाचा आहे, अशी विनंती त्यांनी सभापती प्रतापसिंह राणे यांच्याकडे केली. ही मागणी मान्य करून माजीमंत्री या नात्याने त्यांना स्पष्टीकरण करण्याची अनुमती सभापती राणे यांनी दिली. न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे. नादिया तोरादो मृत्युप्रकरणी आपण जबाबदार असल्याचा एखादा जरी पुरावा पोलिस सादर करू शकले तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊन घरी बसू, असे थेट आव्हान देत, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी सभागृहात केली. सत्ताधारी गटातीलच काही सहकाऱ्यांनी आपल्याला या प्रकरणात गोवण्याचा कट रचला, असा आरोप करत ड्रग माफिया व पोलिस साटेलोटे प्रकरण तसेच अबकारी घोटाळ्याची चौकशी "सीबीआय'मार्फत व्हावी, अशी मागणी करणारा आपण एकमेव मंत्री होतो, याची आठवणही त्यांनी करून दिली. दरम्यान, विद्यमान गृहमंत्री केवळ अल्पसंख्याक नेत्यांना लक्ष्य बनवत आहेत, त्यासाठी त्याच पोलिस अधिकाऱ्यांची मदत घेत आहेत. यापूर्वी चर्चिल आलेमाव, ज्योकिम आलेमाव, बाबूश मोन्सेरात यांच्यावर कारवाई झाली व आता आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली.
४ जुलै रोजी आपल्याला पाचारण केल्याप्रमाणे आपण जबानीसाठी हजर राहिलो, पण आपण लोकप्रतिनिधी असतानाही आपल्या नकळत आपल्या घरावर छापा टाकून झडती घेण्यात आली. आपल्याकडून कोणताही आर्थिक गुन्हा झाला नसताना आपली सर्व बॅंक खाती गोठवण्यात आली. राज्याचा एक आमदार असूनही आपल्याविरोधात देशात व विदेशातही "रेडकॉर्नर'नोटीस जारी करण्यात आली. एका लोकप्रतिनिधीला अशा पद्धतीची वागणूक मिळण्याचा हा प्रकार गेली पस्तीस वर्षे राजकारणात असलेल्या सभापतींनीही कधी पाहिला नसेल. ४ जुलै २०१० रोजी गुन्हा विभागात हजर झाल्यानंतर आपल्याविरोधात मोठा कट रचण्यात आल्याची जाणीव झाली, त्यामुळे आपण कुठेही फरारी न होता न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यासाठी प्रयत्न करीत होतो, असा खुलासाही मिकी यांनी केला. आपण पूर्णपणे निर्दोष आहे, असे आपण समस्त गोमंतकीयांना सांगू इच्छितो, असे मिकी यांनी नतमस्तक होऊन सांगितले.

No comments: