Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 28 July, 2010

जेम्सला चरित्र आणि मिथ्य यांतील फरकच कळला नाही!

शिवछत्रपती ही हाडामांसाची व्यक्ती होती. आपल्या पन्नास वर्षांच्या अल्प आयुष्यात अनेक चित्तथरारक प्रसंगांना सामोरे जाऊन अथवा चित्तथरारक साहसे स्वतः करून चारही दिशांनी वेढून असलेल्या शत्रूंवर मात करून स्वराज्याची ते मुहूर्तमेढ रोवतात; त्याला जेम्स फाकडा Legend भाकडकथा म्हणतो. त्याचे अंतरंग त्याने वापरलेल्या शब्दरचनेतून बरोबर उघडे होते. तो लिहतो -
It is very easy to get swept up by the romance of Shivaji's legend. (पृ.५)
शिवचरित्र हा रोमॅंटिक प्लॉट वाटायला ती काय "रोमियो - जुलिएट'सारखी शेक्सपिअरची शोकान्त नाट्यकृती आहे की पाश्चात्त्य राष्ट्रांतील बालकांना भुरळ पाडणारी "सिन्ड्रेला'ची सुखान्तिका आहे? "देव मस्तकी धरावा। अवघा हलकल्लोळ करावा. देश बडवावा बुडवावा' असा अहोरात्र निजध्यास घेतलेल्या एका अत्यंत श्रेष्ठ नरश्रेष्ठाचे - श्रीमान योग्यांचे जीवन अभ्यासताना त्याने स्फुरण न पावता नर्मदेतल्या पाषाणासारखा कोरडा राहिलेला जेम्स फाकडा आपल्या मनात दुसराच हेतू धरून पुस्तक लिहितो; त्याचाच समाचारच या लेखमालेत घ्यावयाचा आहे.
जेम्स फाकड्याचे खरे मानसिक दुखणे त्याच्या पुढच्याच वाक्यात आपल्याला कळते. In Maharashtra, these stories are so well known and are knit into such seamless narrative, that it is difficult to imagine Shivaji as anything but an example of the regions highest ideals. Shivaji may have been a legend in his own time, but his legend has grown a great deal over the last three hundred years. (पृ.५)
छत्रपतींचे जीवन legend होते? नक्कीच नाही! त्यांच्या जीवनातील घडलेल्या प्रसंगांना धरून कितीतरी मिथ्यकथा legend प्रचारात आल्या असत्या. उदारहणच द्यायचे झाले तर अफझलखान वध, सुरतेवरील स्वाऱ्या, आग्य्राहून सुटका, सिद्धी जोहरच्या वेढ्यातून पार होण्याचा प्रसंग. हे सर्व प्रसंग अद्भुत ठरावेत असेच होते. त्यात legend कशा आल्या असत्या? शिवाजी महाराज भवानी मातेच्या कृपेने आग्य्रावरून कैदेतून सर्व लोकांसह गुप्त झाले आणि राजगडाला जिजामातेच्या महालासमोर प्रगटले, अशी मिथ्यकथा प्रसृत झाली असती तर तिला "रोमॅंटिक लिजन्ड' म्हणता आले असते. पण इतिहासकारांनाही ज्या मार्गाचा अजून मागोवा घेता आला नाही अशा मार्गाने काही महिने वाटचाल करीत लहानग्या संभाजीला दुसऱ्याच्या हवाली करून महाराज सुखरूप राजगडावर पोहोचले. यातच केवढे थरारनाट्य आहे? ती पाश्चात्यांच्या legendary hero Robinhood च्या गोष्टीसारखी भाकडकथा नाही. तर वास्तवात घडलेली घटना आहे. आग्य्राहून सुटकेच्या संदर्भात एका तरी ठिकाणी चमत्काराचे वर्णन वीस वर्षांचा अभ्यास सांगणाऱ्या जेम्स फाकड्याने दाखवावे; तरच शिवचरित्राला legend म्हणता येईल.
आपल्या पुस्तकातील पाचही प्रकरणांचा सारांश देताना त्याने ज्या "Cracks" in the narrative म्हटल्या आहेत त्या किती हास्यास्पद आहेत याचा परामर्ष घेईनच.
शिवचरित्र हे धवल आणि उज्ज्वल आहे याची बहुधा अजाणता कबुली देणारे वाक्य जेम्स फाकड्याने दिले आहे. त्यावरून त्याला चरित्र आणि मिथ्य यातील फरक जाणून घ्यायचा नाही; त्याचा हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश वेगळाच असल्याने हे घडते असे वाचकांच्या आपोआप लक्षात येईल. जेम्स फाकडा लिहीतो - The Shivaj's legend is a glorious story, good guys, though often outnumbered and outguned, win in the end.
या वाक्यांचा गर्भितार्थ असा की, शिवचरित्रातील प्रसंग भाकड आहेत.
विसाव्या शतकात ज्या अनेक संशोधकांनी आपल्या जिवाचे रान करून शिवचरित्राचे पुरावे शोधले, अथक परिश्रमांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा केली, त्या सर्वांचे श्रम, प्रयत्न, ध्येयनिष्ठा जेम्स फाकडा लेखणीच्या एका फटकाऱ्याने नामशेष करतो. The Shivaji's legend is a glorious story. यानंतर त्याच्या मनात असलेले वाक्य पूर्ण पुस्तकाचे विश्लेषण केल्यावर मला वाटले ते असे - It is a story, but not history!

No comments: