Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 30 July, 2010

जेम्सचे महाराष्ट्राबद्दलचे अज्ञान

जेम्स लेनला महाराष्ट्राचे अस्तित्व सातशे वर्षांचेच वाटते. संत ज्ञानेश्वरांचा तो उल्लेख करतो. काय खरोखरच मराठीचे अस्तित्व सातशे वर्षांचे आहे? ज्ञानेश्र्वरांची ज्ञानेश्वरी सातशे वर्षांपूर्वी लिहिली गेली. पण त्याआधी श्रवणबेळ गोळ येथील वाहूबळीच्या चरणापाशी आपले नाव कोरणारा "चावुंड राय' मराठीतूनच बोलत होता. भाषा अशी शतकभरात प्रगत होत नसते आणि मराठी व इतरही भारतीय भाषांबाबत हा काळ शेकडो वर्षांपूर्वीचा धरला पाहिजे.
मराठीच्या बाबत इथे चर्चा करायची आहे. मराठी आणि संस्कृतची नाळ एक आहे. ही संस्कृतोद्भव भाषा आहे. संस्कृत आणि प्राकृताची देवाणघेवण होताना प्राचीन काळीच ज्या प्रमुख चार प्राकृत भाषा विद्वानांना मान्य झाल्या, ज्यांचा प्राचीन प्राकृत व्याकरणातून ऊहापोह झाला आहे. त्यात पैशाची, मागधी, शौरसेनी बरोबरच महाराष्ट्री प्राकृत समाविष्ट आहे. मराठीच्या उगमाचा काळ शोधायचा असेल तर २००० वर्षांपूर्वीच्या सातवाहन वंशातील "हाला'च्या सत्तसईमध्ये शोधावा लागेल. त्यावेळेपासून महाराष्ट्री-मराठी-चे अस्तित्व मानले पाहिजे आणि ती भाषा बोलणाऱ्या समाजाचे अस्तित्व जेम्स लेन लिहितो त्याप्रमाणे मानले पाहिजे. श्री विश्वनाथ खैरे यांच्या संशोधनानुसार संस्कृत-मराठी-तामिळ संमत असाही भाषिक दुवा आहे.
ज्ञानेश्वरांची महाराष्ट्रात पंढरपूरची "वारी'ची प्रथा सुरू केली. त्यापूर्वी कितीतरी शतके विठोबा हे दैवत अस्तित्वात होते. नामदेवासारखा संतकवी त्याच्या भक्तीत भान विसरला होता. जनी त्याच्या नावे पहाटे ओव्या म्हणत होती आणि शिव्या घालून रागे भरत होती. त्या विठोबाच्या अस्तित्वाभोवती आपले भक्तिविश्व गुंफणारे ते महाराष्ट्रीय ही साधी आणि सोपी व्याख्या इरावती कर्त्यांनी (पृ११) विसाव्या शतकात दिली व ती वास्तविक आहे. तिला धरून काही शतकांनी महाराष्ट्र हा विसाव्या शतकानंतर अस्तित्वात आला असा शोध जेम्स लेनसारखा तर्कदुष्ट संशोधक काही शतकांनी लावेल.
एकेश्वरी (Semitic) धर्माच्या अनुयायांना, अनेकेश्वरी धर्मांतील लोकांची मानसिकता समजतच नाही हा अनुभव जेम्स लेनच्या बाबतीत जागोजागी जाणवतो. त्याच्या मते समर्थ रामदास रामभक्त होते. छ. शिवाजी शिवभक्त आणि भवानीचे उपासक होते आणि त्यामुळे त्याच्याच शब्दात सांगायचे तर 'Shivajis devotion to Bhavani and Ramdas's devotion to Rama are only two among many such traditions that do not fall under the Pandharpur umbrella.' (पृ ११) एकेश्वरी पंथाच्या अनुयायांची (इथे लेन प्रॉटेस्टंट आहे, का कॅथलिक आहे किंवा बॅष्टीस्ट आहे इ.ची पार्श्र्वभूमी तपासणे आवश्यक वाटते म्हणून पंथाचा उल्लेख) ठोकळेबाज विचारसरणी इथे स्पष्ट दिसते.
महाराष्ट्राला हरी आणि हराच्या ऐक्याची जाणीव फार पूर्वीपासून होती. विठ्ठलाच्या मूर्तीच्या शिरी महादेवाचे लिंग असण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रातील संतांनी शैव - वैष्णव असा भेदभाव बाळगला नाही याची लेनला माहिती नसावी हे अशक्य वाटते. तो जाणूनबुजून दुर्लक्ष करतो आहे. शिवाजी महाराज पंढरपूरला यात्रेसाठी गेले की नाहीत याचे पुरावे त्यांचे मराठीपण शोधण्यासाठी जेम्स लेनने तपासावे. मात्र समर्थ रामदास पंढरपूरला गेल्याचे उल्लेख आहेत. तेथे विठोबाला कमरेवर हात ठेवून उभा पाहून त्यांनी धनुष्य बाण कुठे गेलेत, बरोबरची सीतामाई कुठे गेली अशी विचारणा केली होती. रामदासी सांप्रदायिक वारांच्या सवाया म्हणून जे अभंग आहेत त्यात बुधवारच्या सवारीमध्ये विठ्ठल - श्रीराम यांची एकरूपता वर्णन केली आहे.
नाम विठ्ठल सुंदर । ब्रह्मा विष्णू आणि हर ।
गुणातीत निर्विकार । शुकादिकी गायिला ।।१।।
चंद्रभागा रम्य वीर । तेथे उभा कटिकर ।
दिंड्या पताका अपार । यात्रा घोष जाहला।।२।।
तेथे येता रामदास । दृढ श्रीरामी विश्वास।
रूप पालटोनी त्यास। रामरूपी भेटला।।३।।
पुन्हा विठ्ठलरूप । राम विठ्ठल येकरूप।
पूर्वपुण्य हे अमूप । लक्ष पायी ठेविल्या ।।४।।
(रामदासी संप्रदायाची नित्योपासना पृ ३९)
वरील अभंगाप्रमाणे समर्थ रामदास वारीच्या दरम्यान पंढरपूरला गेले होते व लेनच्या "मराठी'पणाच्या व्याख्येत ते बसतात. समर्थांचे इतरही काही विठ्ठलभक्तीवर अभंग वर दिलेल्या नित्योपासनेच्या पुस्तकात आहेत. त्यात "येथे उभा का श्रीरामा।.... हा प्रसिद्ध अभंग ही दिला आहे. (पृ ६४) त्यात अभंगाचे शेवटी समर्थ रामदास लिहितात.
काय केला हनुमंत। येथे उभा पुंडलिकभक्त
रामी रामदासी भाव। तैसा होय पंढरीराव।।
महाराष्ट्राचे दुसरे दैवत जेजुरीचा खंडोबा आहे. त्याच्याही दर्शनाला समर्थ रामदास गेले असावेत. जेजुरीचा खंडोबा व श्रीराम यांची एकरूपता त्यांनी तेथे अनुभवली ती अभंग "रविवारची सवाची' म्हणून येतो - दास म्हणे रामराव। राम तोची खंडेराव। जेथे भाव तेथे देव। लक्षपायी जडलिया।।
(रामदासी संप्रदायाची नित्योपासना पृ ४१)
परमेश्वराच्या "पायी लक्ष जडलिया' भाव तेथे देव हा अनुभव झापडे लावलेल्या एकेश्वरी पंथीयांना समजण्या पलीकडचा आहे, त्यांना परमेश्वराचे निरनिराळ्या जड व चेतन स्वरूपातील अस्तित्व मान्यच नसते. अशी मनोधारणा असलेला जेम्स लेन मराठी मनाचा मागोवा घेऊ शकेल? (क्रमशः)

No comments: