Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 27 July, 2010

जेम्सला चरित्र आणि मिथ्य यांतील फरकच कळला नाही!

गेली वीऽऽऽस वर्षे मी ही संशोधन करतो आहे. माझा वैदिक मिथ्य कथेवरील पहिला संशोधनपर लेख भांडारकर विद्या मंदिराच्या वार्षिकात १९८३ साली प्रसिद्ध झाला तेव्हापासूनचा माझा अनुभव आहे की, हे पाश्चात्त्य संशोधक बेधडक काही विधाने ठोकून देतात आणि आपले परक्या ओंजळीने पाणी पिणारे संशोधक ते "साहेब वाक्यं प्रमाणम्' या गुलामीच्या वृत्तीतून तसेच्या तसे संदर्भ देत राहतात. भारतीय सामाजिक परंपरा आणि भारताच्या किंवा दक्षिण आशियाच्या या बृहत्तर भारताच्या इतिहासाचा बट्ट्याबोळ करण्याचे श्रेय या पाश्चात्य संशोधकांना जाते.
इथे उदाहरणादाखल दुसरे वाक्य देतो. पृ. ९८ वर जेम्स फाकडा लिहितो - Shivaji's kingship certainly revived old sanskritic practices largely forgotton in his day, but he could not escape the cultural dominance of worldwide Islam.' आणि वरचा परिच्छेद संपताच दुसऱ्या परिच्छेदाची सुरवात - 'Let us assume that Shivaji did attempt to revive specifically Hindu practices by patronizing a sanskrit poet giving his ministers sanskrit titles!' (पृ.९९) ज्या सामान्य वाचकाला इंग्रजी कळते त्याला 'Certainly revived old sanskritic practices' आणि let us assume that Shivaji did attempt to revive specifically Hindu practices या दोहोंतील कोणते खरे मानायचे हा प्रश्न पडेल. व्वा रे संशोधन! ज्याच्या केवळ एका परिच्छेदाच्या अंतर्गत प्रतिपादनात इतकी तफावत येते त्याला संशोधक म्हणायचे? मला जेम्स फाकड्याची कीव येते.
असे हे पुस्तक लिहिले गेले आहे. शिवाजी महाराजांविषयी भारतीय माणसांत असलेली आत्मीयता, त्यांच्या पुण्यस्मरणाने मिळणारी स्फूर्ती इ. गोष्टींमुळे भारतीय अभ्यासकांना त्रयस्थ किंवा तटस्थ राहून संशोधन करता आले नाही, असा जेम्स फाकड्याचा सूर आहे. त्यात वर दिल्याप्रमाणे अनेक विसंवादी सूर मिसळलेले आहेत.
जेम्स फाकड्याचा पुस्तक लिहिण्याचा उद्देश काय? त्याने म्हटल्याप्रमाणे 'I have taken on two tasks. First to understand the seventeenth century Shivaji and the kind of hero he was in the context of the Maharashtrian Culture of that time but second and more important is to examine critically the growth of his legend as it relates to narratives of Maharashtrian Hindu identity. (पृ.५)
वर दिलेल्या दोन्ही उद्देशांची पूर्ती करण्यात जेम्स फाकडा कितपत सफल झाला आहे हे या लेखमालेत सविस्तर पाहायचे आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रीय हिंदुत्वाचा आणि शिवाजी संदर्भातील मिथ्यकथांचे त्याला विश्लेषण करावयाचे आहे. पुढे कुठेतरी त्याने Historiography - इतिहास मिमांसा असा शब्द शिवचरित्रांच्या संदर्भात वापरला आहे. मात्र इतिहास मिमांसा कशाशी खातात याची जेम्स फाकड्याला पुसटशीही कल्पना नाही. एकीकडे शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण करण्याचा आव आणणाऱ्या जेम्स फाकड्याचे अंतरंग विश्लेषण त्याने वापरलेल्या शब्दांवरून सहज करता येते.
इंग्रजीत Legend हा शब्द मिथ्यकथा, भाकडकथा - अतिमानुषकथा या अर्थी वापरला जातो. Legend म्हणजे थोडक्यात विश्वास न ठेवता येण्याजोगी गोष्ट. उदाहरणच द्यावयाचे झाले तर महाराष्ट्रात जागोजागी विखुरलेल्या लेण्यांना पांडव लेणी म्हणतात. त्यांना पांडव लेणी का म्हणत तर पांडवांनी त्यांच्या १२ वर्षांच्या वनवासात कोणत्यातरी रात्री त्या डोंगरात महाल कोरून काढला. मिथ्य असे तयार होते. आज पांडव लेण्यांचे खरे स्वरूप लक्षात आल्यानंतर त्यामागचे मिथ्य - भाकडकथा लुप्त झाल्या आहेत. पांडव लेणी ही Legend झाली. पण शिवछत्रपती ही हाडामांसाची व्यक्ती होती. आपल्या पन्नास वर्षांच्या अल्प आयुष्यात अनेक चित्तथरारक प्रसंगांना सामोरे जाऊन अथवा चित्तथरारक साहसे स्वतः करून चारही दिशांनी वेढून असलेल्या शत्रूंवर मात करून स्वराज्याची ते मुहूर्तमेढ रोवतात; त्याला जेम्स फाकडा Legend भाकडकथा म्हणतो. त्याचे अंतरंग त्याने वापरलेल्या शब्दरचनेतून बरोबर उघडे होते.

No comments: