Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 31 July, 2010

आझिलो इस्पितळाची स्थिती खरोखरच नाजूक - मुख्यमंत्री

म्हापसा, दि. ३० (प्रतिनिधी)- येथील आझिलो इस्पितळाचा विषय स्थानिक आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा तसेच बार्देशच्या आमदारांनी विधानसभेत उचलून धरल्यानंतर मी स्वतः जुने आझिलो इस्पितळ आणि नवीन बांधण्यात आलेल्या जिल्हा इस्पितळाला भेट देण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे आज या दोन्ही इस्पितळांची पाहणी केली असता खरोखरच जुन्या आझिलो इस्पितळाची स्थिती नाजूक असल्याची जाणीव झाली आहे. येत्या आठवड्यात आरोग्यमंत्री तसेच बार्देशच्या आमदारांची बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी म्हापसा येथे इस्पितळाला भेट दिल्यानंतर दिली.
यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, म्हापशाचे आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा तसेच आझिलोचे अधिकारी दळवी उपस्थित होते. सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांनी जुन्या आझिलो इस्पितळाला भेट देऊन पाहणी केली व रुग्णांना औषधे वगैरे बरोबर मिळतात की नाही याची विचारपूस केली. दर दिवशी इस्पितळात येणाऱ्या रुग्णांची संख्या तसेच त्यांना होणारे त्रास यांची माहिती त्यांनी जाणून घेतली.
दिवसाकाठी सरासरी पाचशेपेक्षा अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात, त्यांच्या तुलनेत जुन्या आझिलोची जागा बरीच कमी आहे. यामुळे नवीन जिल्हा इस्पितळात ओपीडी लवकरच सुरू करण्यात येईल. जिल्हा इस्पितळाचे बांधकाम एकदम सुरेख पद्धतीने झाले आहे. येथील वातावरणही चांगले असल्याने लवकर इस्पितळ इस्पितळ सुरू करण्याचा निर्णय घेऊन नंतर हळूहळू मोठे विभाग सुरू केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री कामत यांनी उपस्थितांना सांगितले.
म्हापशाचे आमदार डिसोझा यांनी सांगितले की, गेली अडीच वर्षे म्हापशाचे जिल्हा इस्पितळ बांधून तयार आहे. सर्व सोईसुविधा येथे उपलब्ध आहेत. यामुळे हे इस्पितळ फार पूर्वी सुरू व्हायला हवे होते. इस्पितळ लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी मी परिश्रम घेतले आणि लवकरच इस्पितळ सुरू होत असल्याने जनतेला त्याचा फायदा होणार आहे, हेच माझे समाधान आहे. या परिश्रमाचे श्रेय भाजप कार्यकर्ते, पत्रकार आणि संबंध जनतेला जात असून मी केवळ माझे काम केले आहे, असे ते म्हणाले.

No comments: