Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 29 July, 2010

लेनच्या मते "भारतीय' ही संकल्पनाच अवास्तव

जेम्स लेनने निवडलेले शब्द त्याच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतात. त्याचबरोबर त्याचा हे पुस्तक लिहिण्याचा उद्देश काय असावा याची पुरेपूर झलकही मिळते. अगदी पहिल्याच प्रकरणात त्याने शालेय पुस्तकांच्या प्रारंभी देण्यात येणाऱ्या प्रतिज्ञेची (pledge) दखल घेताना त्यात निर्देश केलेल्या "भारतीय' जनतेचा उल्लेख 'imagined community of India' असा केला आहे. त्याने वाक्यही उद्धृत केले आहे. (India is my country, all Indians are my brothers and sisters). 'Imagined community' हे शब्द अवतरणात घालण्याचा जेम्स लेनचा उद्देश स्पष्ट आहे. त्याच्या मते "आम्ही सारे भारतीय' ही संकल्पनाच "अवास्तव' आहे.
गेली हजारो वर्षे "भारतवर्ष' हे नाव प्रचारात आहे. ज्या भारतामुळे या भूमीला भारतवर्ष नाव पडले त्या शकुंतलेच्या पुत्राची, भरताची कथा आसेतु हिमालय भारतातील बालके गेली शेकडो वर्षे ऐकत आहेत, ज्या भारतातील नागरिक उत्तरेस बद्रिकेदार ते दक्षिणेतील रामेश्वर व पूर्वेकडील कामारव्या तीर्थापासून पश्चिमेस हिगलाज तीर्थ - बलुचीस्थानपर्यंतच्या भूभागांत सांस्कृतिक एकात्मता अनुभवत आहेत, त्याला जेम्स लेन 'Imagined community' म्हणतो. मला त्याची मानसिकता कळते.
गेल्या जेमतेम पाचशे वर्षांचा, हाणामारी, वंशच्छेद आणि काळ्या अमेरिकनांच्या गुलामीचा शालेय इतिहास शिकलेला जेम्स लेन अमेरिकेकडे melting pot म्हणून पाहायला शिकला. या मेल्टींग पॉटमध्ये अजूनही त्यातील घटक पूर्णपणे वितळलेले नाहीत. काळे अमेरिकन त्यांच्यावर लादलेले वेगळे अस्तित्व राखून आहेत, गोऱ्या अमेरिकनांमध्ये त्यांच्या युरोपियन पूर्वजांच्या स्मृती जागृत आहेत; इथे स्थायिक झालेले दक्षिण अमेरिकेचे निर्वासित स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आहेत, नव्याने अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारलेले इतर विकसित - अविकसित देशांतील नागरिक त्यांचे वेगळे सांस्कृतिक अस्तित्व राखून आहेत; अशी केवळ आर्थिक सुबत्ता व कडक कायदेकानून यांच्या आधारावर एकत्र बांधली गेलेली अमेरिकन नागरिकत्वाची मोट जेम्स लेनने अनुभवली आहे. त्यामुळे भारतात ठिकठिकाणी अनुभवाला येणारी सांस्कृतिक एकात्मता एकतर त्याला अनुभवता आली नाही किंवा त्याने वाचकांचा बुद्धिभेद करण्यासाठी 'Imagined community' असे ठोकून दिले.
लेनच्या अभ्यासाच्या मुळाशी त्याला १९८८ मध्ये वाचायला मिळालेले चौथीच्या वर्गासाठी क्रमिक पुस्तक असलेले शिवचरित्र आहे. लेनच्या मते बालवयात जे शिवचरित्र अभ्यासले जाते त्याचा दूरगामी परिणाम महाराष्ट्रातील हिंदू पिढीवर होतो. त्यांच्या मते शिवचरित्रांचा अभ्यास करणाऱ्या संशोधक व इतिहासकारांनी शोधलेल्या व लिहिलेल्या सर्व लिखाणाचे सार या चौथीच्या क्रमिक पुस्तकात आले आहे. शिवाजी महाराजांच्या समकालीन लिखाणामध्ये शिवचरित्राचे गुणगान करण्याचा उद्देश होता तर विसाव्या शतकातील इतिहासकारांना शिवचरित्राचा मागोवा घेताना महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास लिहायचा होता, असे लेनचे म्हणणे आहे.
इथे प्रश्न पडतो की, इतिहास ही लढाया, राज्यांची नावे, तहाची कलमे यांची जंत्री असते की एखाद्या भूभागात शेकडो वर्षे वास्तव्य करून राहणाऱ्या मानवसमूहाचे सत्त्व आणि सामाजिक व सांस्कृतिक एकात्मता यांचा मागोवा घेण्याचे त्यामागे उद्दिष्ट असते. जेमतेम पाचशे वर्षांचाच इतिहास सांगणाऱ्या अमेरिकन इतिहासकारांनी गोऱ्या आक्रमकांना श्रेष्ठ ठरवून त्या प्रमाणे अमेरिकेचा इतिहास लिहिला आहे. त्या इतिहासात पूर्वी तेथे वास्तव्य करून राहिलेल्या स्थानिक रेड इण्डियन लोकांचा निर्देश नावापुरताच केला आहे. त्यांच्यावर झालेला अत्याचार, त्यांचा निर्वंश इ. गोष्टी थोडक्यात सांगून अमेरिकेचा इतिहास कसा धवल यशाचा इतिहास आहे याचे प्रतिपादन केलेले असते. जर अमेरिकेत हे घडते तर भारतीयांनी तरी आपल्या इतिहासाचा मागोवा आपली सांस्कृतिक अस्मिता व एकात्मता येणाऱ्या पिढ्यांना सांगण्यासाठी का लिहू नये? लेन ज्या कार्यकारण मीमांसेचा - teleology of the long cultural process (पृ. ७) - उल्लेख करतो ती मीमांसा प्रत्येक देशातील इतिहासकारांनी त्यांच्या देशाचा इतिहास लिहिताना डोळ्यापुढे ठेवली आहे. हे करताना अनेक देशांतील इतिहासकारांनी आक्रमकांना सज्जन आणि तारणहार ठरविले कारण विसाव्या शतकात आक्रमकांच्या धार्मिक आक्रमणाला बळी पडलेल्या देशांतील इतिहासकारांनी त्यांच्या देशाचा प्राचीन काळापासूनचा इतिहास नव्या धार्मिक दृष्टिकोनातून लिहिला. उदाहरण द्यायचे झाले तर आता मुस्लीम धर्मीय असलेल्या पाकिस्तानच्या इतिहासात भारतावर सातव्या शतकात पहिले मुसलमानी आक्रमण करणारा क्रूरकर्मा, ज्याने खलिफाकडे गुलाम करून पाठविले, तो मुहम्मद बीन कासीन प्रेषिताचा शांतिदूत आणि स्थानिक जनतेचा तारणहार होता असे शिकविले जाते.
इतिहास वास्तवात काय होता आणि तो शालेय पुस्तकातून कसा शिकविला जातो याचे प्रत्यंतर अमेरिकेच्या इतिहासावरून दिसते. पुढे जाऊन स्वतः लेनने त्याची कबुली दिली आहे. मात्र शिवचरित्रे अभ्यासताना तो वस्तुनिष्ठ दृष्टिकोन (objectivity) ठेवू शकलेला नाही.
क्रमशः

No comments: