Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 30 July, 2010

'कवठणकरवरील हल्ल्यामागे साळगावकरांचा हात शक्य'

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): "एनएसयुआय'चे अध्यक्ष सुनील कवठणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामागे गुन्हा अन्वेषण विभागाचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे "एनएसयुआय'चे सदस्य नितीन आनंदआशे यांनी म्हटले आहे. सह्यांच्या मोहीम सुरू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपअधीक्षक साळगावकर यांनी कवठणकर यांच्या पर्वरी येथील घरी एका निरीक्षकासह सात पोलिसांना पाठवून जबानी देण्यासाठी गुन्हा अन्वेषण विभागात उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानंतर सह्यांची मोहीम थांबवण्यासाठीही दबाव घातला होता, असा दावा "एनएसयुआय'केला आहे.
कवठणकर यांच्यावर हल्ला झाला त्या दिवशी अस्नोडा मार्गे सुनील डिचोलीला जाणार हे कोणालाच माहिती नव्हते. केवळ डिचोली येथील एका तरुणाला सुनील यांनी आपण येत असल्याचे मोबाईलद्वारे कळवले होते. या मोबाईलवरील संभाषण गुन्हा अन्वेषण विभागातील पोलिसांनी "टॅप' केले असावे, असा दावा नितीन आनंदआशे यांनी केला आहे. पोलिस ड्रग माफिया प्रकरणाची "सीबीआय'मार्फत चौकशी झाल्यास अनेक पोलिस अधिकारी गोत्यात येणार असल्यानेच पोलिसांना ही मोहीम बंद करण्याची धडपड चालवली आहे.
या प्रकरणात सुमारे ५८ दिवस फरार असलेला संजय परब याला पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा त्याने एका वरिष्ठ अधिकाऱ्याला आपण सर्वांची नावे उघड करू अशी, धमकी दिल्याचे उघडकीस आले होते.

No comments: