Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 26 July, 2010

मिकींच्या जामिनावर आज सत्र न्यायालयात निवाडा

मडगाव दि. २५ (प्रतिनिधी) : नादिया तोरादो मृत्युप्रकरणी सध्या सडा तुरुंगातील न्यायालयीन कोठडीत असलेले माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर उद्या (सोमवारी) सकाळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे निवाडा देणार आहेत. शुक्रवारी त्यांच्यासमोरच या अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाले होते व त्यांनी सोमवारी सकाळपर्यंत निकाल राखून ठेवला होता.
शुक्रवारी सकाळी गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडीने) त्यांना पोलिस कोठडीचा रिमांड संपल्यानंतर येथील प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी त्यांची १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. मडगावातील न्यायालयीन कोठडीत जागा उपलब्ध नसल्याने सीआयडीने त्यांना सडा तुरुंगाधिकाऱ्यांच्या हवाली केले होते.
मिकींच्या वतीने या प्रकरणात प्रथमच ऍड. आनाक्लात व्हिएगस यांनी बाजू मांडलेली असून मिकी समर्थकांच्या त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा आहेत. मिकींविरुद्धची अन्य तीन प्रकरणेही पोलिसांनी उकरून काढली असून त्या प्रकरणात पोलिस आपणास अटक करतील या भीतीपोटी मिकी यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावरही न्या. देशपांडे निवाडा देणार आहेत. त्यातील एक प्रकरण सारा पाशेको यांनी २००९ मध्ये नोंदवलेल्या तक्रारीसंदर्भातील आहे. बेताळभाटी येथील घर व मालमत्तेसंदर्भातील व्यवहारासाठी त्यांनी मिकींना दिलेले मुखत्यारपत्र त्यांनी बनावट कागदपत्र व सह्या करून दुसरी पत्नी व्हियोलाच्या नावे केले. त्या कागदपत्रांचा वापर करून त्यांनी ईडीसीकडून ४ कोटींचे कर्ज त्यांच्या व व्हियोलाच्या नावावर असलेल्या शिपिंग कंपनीसाठी घेतले असे या तक्रारीचे स्वरूप आहे.
दुसरे प्रकरण बनावट सही करून आलिशान गाडी विकल्याचे दुसरे प्रकरण असून त्याची नोंद केपे पोलिसांत झाली आहे. तिसरे प्रकरण मडगाव पोलिसांत नोंदले गेले आहे. बनवेगिरी करून फ्लॅट विक्री केली असे त्याचे स्वरूप आहे. चौथे प्रकरण नगरनियोजन खात्याने नोंदवले असून ते बेकायदा भरावाचे आहे.

No comments: