Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 31 July, 2010

रवीनाच्या ओटीपोटात रक्त साठले होते

शवचिकित्सा अहवाल राखीव

पणजी व वास्को, दि. ३० (प्रतिनिधी)- डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेल्या रवीना रॉड्रिगीस हिच्या मृतदेहाची शवचिकित्सा करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण राखीव ठेवण्यात आले आहे. दरम्यान, रवीना हिच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. एस. एन. सुरमे यांनी केवळ आपल्या इस्पितळातील जागेचा वापर केला, या व्यतिरिक्त आपल्या इस्पितळाचा यात कोणताच सहभाग नाही, असा दावा पै नर्सिंग होमचे डॉ. श्रीधर पै यांनी केला आहे. यामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात सेवा बजावणारे डॉ. सुरमे व रवीना हिच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉ. आमोणकर गोत्यात येण्याची शक्यता आहे.
अधिक माहितीनुसार रवीना रॉड्रिगीस हिला दि. २ रोजी वास्को येथील डॉ. एस. एन. सुरमे यांनी पै नर्सिंग होममध्ये दाखल करून घेतले होते. तर, दि. ३ रोजी तिच्यावर शस्त्रक्रिया केली होती. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. आमोणकर यांना बोलावण्यात आले होते. "एपेंडिक्स'वर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर तिला तीन दिवसांनी घरी पाठवण्यात आले होते. परंतु, तिच्या ओटीपोटात प्रचंड कळा यायला लागल्याने पुन्हा ९ जुलै रोजी तिला त्याच इस्पितळात दाखल करण्यात आले. यावेळी केलेल्या तपासणीत तिच्या ओटीपोटात रक्त साठल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिला त्वरित गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला. तसेच तिच्यावर शस्त्रक्रिया केलेल्या डॉ. आमोणकर यांनाही याविषयी माहिती देण्यात आली. दुपारी रवीना हिला गोमेकॉत दाखल केले. परंतु, डॉ. आमोणकर हे अन्य एका कार्यक्रमात व्यस्त राहिल्याने तिच्यावर डॉ. राजेश पाटील यांनी शस्त्रक्रिया केली. यावेळी त्यांनी पोटातील एक अवयव काढल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात रवीनाची प्रकृती अधिक खालावल्याने तिचे काल सकाळी निधन झाले.
डॉक्टरांना आपली चूक लक्षात आल्याने तिच्या नातेवाईकांवर मृतदेहाची शवचिकित्सा न करताच तो घेऊन जाण्यासाठी दबाव आणण्याचाही प्रयत्न यावेळी गोमेकॉने केला. परंतु, यात डॉक्टरांची हलगर्जीपणा स्पष्ट दिसून आल्याने तिच्या कुटुंबीयाने वास्को व आगशी पोलिस स्थानकात तक्रार नोंद केली. रवीना ही नागोवा येथील सेंट. झेव्हियर कॉन्व्हेन्ट विद्यालयाची हुशार विद्यार्थिनी होती. तसेच ती उत्तम फुटबॉलही खेळत होती. नववीत शिकणाऱ्या मुलीच्या निधनाने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय, असे तिचे भावोजी पिएदाद रॉड्रिगीस यांनी सांगितले.
वरील दोन्ही डॉक्टर गोमेकॉत सेवा बजावणारे सरकारी डॉक्टर असून त्यांना नियमानुसार खासगी इस्पितळात सेवा बजावता येत नाही. या प्रकरणामुळे सरकारी डॉक्टर खासगी इस्पितळात सेवा बजावत असल्याचे स्पष्ट झाले असून यावर आरोग्यमंत्री कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

No comments: