Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 25 July, 2010

सुनील कवठणकरांवरील हल्ल्याचा कडाडून निषेध

कॉंग्रेस राजवटीत पक्षाचे युवा नेतेच असुरक्षित

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) - कॉंग्रेस सरकारच्या राजवटीत "आयटी पार्क'च्या समर्थनार्थ मोर्चा काढलेल्या युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण करण्याचा प्रकार २००८ साली घडला असतानाच आता "एनएसयुआय' या कॉंग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनेचे गोवा प्रदेश अध्यक्ष सुनील कवठणकर यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाल्याने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारच्या राजवटीत सरकारच्या चुकांवर बोट ठेवणाऱ्यांचा आवाज दडपण्याचाच हा प्रकार आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले. या राज्यात युवकांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न सुरू असून तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया विविधयुवक संघटनांनी व्यक्त केली. ही कृतीच मुळे भ्याडपणाची आहे व राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे कसे तीन तेरा उडाले आहेत, त्याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणावे लागेल,अशी प्रतिक्रिया भाजप विद्यार्थी मंचाचे निमंत्रक आत्माराम बर्वे यांनी दिली. कॉंग्रेसप्रणीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवरच अशा पद्धतीचे हल्ले होत असताना सरकार गुन्हेगारांवर काहीही कारवाई करीत नाही, यावरून येथे सामान्य जनतेची फिकीर हे सरकार करत नसल्याचेच उघड झाल्याचे बर्वे म्हणाले.
आपल्या युवा नेत्यावर प्राणघातक हल्ला होऊनही युवक कॉंग्रेस संघटना मूग गिळून गप्प बसणे ही लाचारीची परिसीमा असल्याचा टोलाही बर्वे यांनी हाणला. या हल्ल्याची ताबडतोब चौकशी व्हावी व गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. ड्रग व्यवहाराला बळी पडणारे हे बहुतांश युवक आहेत. राज्यात पोलिस व राजकारण्यांच्या आश्रयाने ज्या पद्धतीने हा व्यवहार फोफावत आहे ते पाहता युवकांनीच आता त्याविरोधात दंड थोपटण्याची गरज आहे. राज्यात ड्रग माफिया, पोलिस व राजकीय नेत्यांचे साटेलोटे असल्याचे लकी फार्महाऊस या स्वीडिश मॉडलने "यूट्यूब'च्या माध्यमातून उघड करून खळबळच उडवली होती. याप्रकरणी सात पोलिस व दोन ड्रग व्यवहार करणाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणाची चौकशी "सीबीआय' किंवा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे द्यावी, अशी मागणी सुनील कवठणकर यांनी करून आपल्याच सरकारला घरचा आहेर दिल्याने सरकारची प्रचंड नाचक्की झाली आहे. "एनएसयुआय'मार्फत याप्रकरणी राबवण्यात येणाऱ्या सह्यांच्या मोहिमेलाही सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
मुळातच गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक याचा या प्रकरणांत समावेश असल्याचा सनसनाटी आरोप लकी फार्महाऊसने केल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. सुनील कवठणकर यांनी संघटनेच्या दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हा विषय कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांच्याकडे नेला होता. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहे. या घटनाक्रमांच्या पार्श्वभूमीवर सुनील कवठणकर यांच्यावर अज्ञातांनी केलेला प्राणघातक हल्ला ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. राज्यात अनैतिक व्यवहार करणाऱ्यांकडून दहशतीचे वातावरण पसरवले जात असून ही धोकादायक परिस्थिती असल्याची टीकाही अनेकांनी केली आहे.
आपण या हल्ल्याचा निषेध करतो, असे सांगून या विषयी मुख्यमंत्री दिगंबर कामत व गृहमंत्री रवी नाईक यांच्याशी चर्चा करू, अशी माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी दिली. सुनील कवठणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करा. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी व गंभीर असल्याचे युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संकल्प आमोणकर म्हणाले.
कॉंग्रेसच्या राजवटीत जनहिताच्या विषयावर आवाज काढल्यास त्याची काय स्थिती होते, हेच या कृतीव्दारे दाखवण्याचा तर हा प्रकार नाही ना, असा सवाल भाजपचे सरचिटणीस प्रा.गोविंद पर्वतकर यांनी केला. युवकांनी जनतेचे विषय न हाताळता केवळ नेत्यांचे तळवे चाटत बसावे, असेच या सरकारला वाटते की काय, असेही पर्वतकर म्हणाले.
ड्रग प्रकरणाची चौकशी "सीबीआय' मार्फत करावी, अशी मागणी केलेल्या सुनील कवठणकर यांना या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हा अन्वेषण विभागाने समन्स जारी करून जबानीसाठी पाचारण करण्याचीही घटना घडली होती. या जबानीवेळी कवठणकर यांनी "सीआयडी'तीलच वरिष्ठ अधिकारी या व्यवहारात गुंतल्याची जबानी दिल्याने त्यांची जबानी नोंदवणाऱ्या पोलिसांचेही धाबे दणाणले होते.
दरम्यान,ड्रग व्यवहार प्रकरणाची चौकशी "सीबीआय'कडे सोपवण्यावरून भाजप आमदारांनी विधानसभेतही जोरदार आवाज उठवला होता. खुद्द सत्ताधारी आघाडी सरकारच्या अनेक आमदारांनीही भाजपच्या या मागणीला पाठिंबा दर्शवला होता. या मागणीवरून विरोधकांनी गदारोळ माजवल्याने दोन वेळा अधिवेशन तहकूबही करावे लागले होते. गृहमंत्री रवी नाईक हे सध्या प्रकृती अस्वास्थामुळे अधिवेशनात भाग घेत नसल्याने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावरच गृह खात्यावरील टीकेला तोंड देणे भाग पडले आहे.विधानसभेतील बहुतांश आमदारांकडून "सीबीआय'चौकशीची मागणी होऊनही सरकार मात्र त्यासाठी राजी नसल्याचेच दिसून आल्याने सामान्य जनतेच्या मनात संशय बळावला आहे. कवठणकर याच्यावर झालेला हल्लाही ड्रग व्यवहार प्रकरणाचीच परिणती असल्याचेही आता उघडपणे बोलले जात आहे.

No comments: