Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 30 July, 2010

महागाईविरोधात १० कोटी सह्यांचे भाजपचे निवेदन राष्ट्रपतींना सादर

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेऊन आत्तापर्यंत देशभरातून जमा करण्यात आलेल्या महागाईविरोधातील सुमारे १० कोटी सह्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभा विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, अरुण जेटली, रवीशंकर प्रसाद तसेच भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर व देशभरातील विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे खासदार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, महागाईची समस्या जनतेला भेडसावणारा प्रश्न असून त्यामुळे आम जनता त्रस्त होत चालली आहे. वारंवार दरवाढीचे प्रकार भाजप कदापि सहन करणार नाही, त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी गोवा भाजप सदैव जनतेच्या पाठीशी असेल, असे पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
कॉंग्रेसप्रणीत युपीए सरकारला जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात ठेवण्यात पूर्णपणे आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ भाजपतर्फे हाती घेतलेल्या दरवाढविरोधी स्वाक्षरी मोहिमेला राज्यात तसेच देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. गोव्यातून पक्षाने १ लाख सह्या गोळा केल्या होत्या.
गोवा प्रदेश भाजपच्या महिला मोर्चा, युवा मोर्चा, प्रदेश स्तरावर तसेच मंडल स्तरावरही या वाढत्या महागाईच्या विरोधात अनेक निषेध मोर्चे, धरणे, जाहीर सभा तसेच अन्य कार्यक्रम राबवण्यात आले, त्याला गोमंतकीय जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. राज्यातील महिला मोर्चाने विविध तालुक्यातील उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांना सादर केलेली निवेदने, रामलीला मैदान येथे काढण्यात आलेल्या प्रचंड रॅलीत ५०० गोमंतकीयांचा सहभाग, पणजी कस्टम जेटीजवळ अनेकदा आयोजित धरणे, यशस्वीपणे राबवलेला ५ जुलैचा भारत बंद, ज्यात गोमंतकीय जनतेने स्वयंस्फूर्तीने दिलेला अभूतपूर्व पाठिंबा, या उल्लेख करण्यासारख्या घटना होत्या. विविध राज्यातील विधानसभा, लोकसभा व राज्यसभेतूनही महागाईचा प्रश्न आमदार, खासदारांनी उचलून धरला आहे व संसदीय कामकाज रोखून धरले आहे. याचाच परिपाक म्हणून हल्लीच इंधन व स्वयंपाक गॅसमध्ये कॉंग्रेस सरकारने केलेली दरवाढ जनता व भाजपच्या दबावापुढे नमते घेऊन काही प्रमाणात कमी करावी लागली होती. एकप्रकारे हा भाजप व गोमंतकीय जनतेचा विजय होता. भाजपचे गोव्यातील एकमेव खासदार श्रीपाद नाईक यांनी लोकसभेत अनेकवेळा महागाईचा विषय उचलून धरला आहे.

No comments: