Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 26 July, 2010

अखेर उत्कर्षा परबचा दुर्दैवी मृत्यू

उपनिरीक्षकाला तात्काळ निलंबित करा; अन्यथा वाळपई बंद
आज दुपारी १२ पर्यंतची मुदत


वाळपई, दि. २५ (प्रतिनिधी) - स्वतःच्या खुद्द मामीने अपहरण केलेल्या सत्तरी ब्रह्मकरमळी येथील उत्कर्षा उदय परब या सोळा वर्षीय मुलीचा सकाळी ५.४५ च्या सुमारास बांबोळी येथे "गोमेकॉ'त दुदैवी अंत झाला. या घटनेचे अत्यंत तीव्र पडसाद सत्तरी ब्रह्मकरमळी भागात उमटले आणि संतप्त जमावाने वाळपई पोलिस स्थानकावर मोर्चा नेऊन या प्रकरणास जबाबदार असलेले पोलिस अधिकारी व अन्य संशयितांवर ताबडतोब कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. यासंदर्भात पोलिसांना कारवाईसाठी ग्रामस्थांनी आज (सोमवारी) दुपारी बारापर्यंतची मुदत दिली आहे; अन्यथा वाळपई बंदचा इशारा दिला आहे. दरम्यान, अत्यंत शोकाकूल वातावरणात उत्कर्षाला आज संध्याकाळी साडेआठच्या सुमारास अंतिम निरोप देण्यात आला तेव्हा अनेकांनी स्मशानभूमीत अक्षरशः हंबरडा फोडला.
गेले दोन दिवस उत्कर्षाची मृत्यूशी झुंज सुरू होती. तिला रक्ताच्या उलट्या होत होत्या. त्यामुळे पहाटे तिची प्रकृती खालावली व त्यातच तिचा मृत्यू झाला. ती मरण पावल्याचे वृत्त गावात येऊन थडकताच ग्रामस्थ संतापले. संतप्त जमावाने सकाळी ११ वाजता नगरगाव ग्रामसभेत धडक मारली. डिचोली व वाळपई पोलिस स्थानकातील तपास अधिकाऱ्यांची ताबडतोब चौकशी करून डिचोलीचे पोलिस उपनिरीक्षक तेरेस वाझ यांना तात्काळ निलंबित करावे असा ठराव पंच, सरपंच व उपस्थित ग्रामस्थांनी एकमुखाने संमत केला.
यावेळी बोलताना पंच राजेंद्र अभ्यंकर यांनी कर्तव्यचुकार पोलिसांवर कडक कारवाई करावी; अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही असा निर्वाणीचा इशारा दिला. नंतर सर्व ग्रामस्थ पंच, सरपंच यांनी वाळपई पोलिस स्थानकावर धडक मोर्चा नेला. प्रवेशद्वारावर मोर्चा अडवण्यात आला. मात्र आक्रमक बनलेल्या जमावाने न्याय मिळावा यासाठी विधानसभेवर मोर्चा नेण्याचा इशारा दिला. संतप्त जमावाने उपनिरीक्षक वाझ तसेच स्नेहलचा मामा आत्माराम नाईक गावकर, सुब्बाराव माशेलकर यांनाही अटक करण्याची मागणी केली. अखेर संध्याकाळी स्नेहलची आई सुमेधा राऊत व वडील संतोष राऊत यांनाही अटक करण्यात आली आहे. उत्तर गोवा अधीक्षक अरविंद गावस. उपअधीक्षक बॉसेट सिल्वा, वाळपईचे पोलिस निरीक्षक सीताराम वायंगणकर, डिचोलीचे निरीक्षक हरिष मडकईकर यांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ करीत होते. यावेळी उत्कर्षाचे नातेवाइक धाय मोकलून रडत होते. हे दृश्य काळीज पिळवटून टाकणारे होते.
मृत उत्कर्षा हिला सरबतातून "रेटॉल' (उंदीर मारण्याचे औषध) घालून पिण्यासाठी दिले होते. त्याची कल्पना उत्कर्षाला आली नाही. तिची मामी स्नेहल गावकरने हे कृत्य केले. मामीच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर तीन दिवसांनी तिला अस्वस्थ वाटू लागले. शरीरावर हळूहळू परिणाम होऊ लागला. मग तिला २२ रोजी बांबोळी येथे "गोमेकॉ' इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या व आज तिची प्राणज्योत मालवली.
अपहरणानंतर मामीने उत्कर्षाला धबधबावाडा येथे कोंडून ठेवले होते. उत्कर्षाचे वडील उदय यांनी याबाबत सांगितले की, डिचोलीचे पोलिस उपनिरीक्षक वाझ यांना उत्कर्षा प्रकरणाची माहिती आपण दिली. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करून उलट मलाच शिवीगाळ केली. वाझ हे माझे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नव्हते.
या मृत्यू प्रकरणात स्नेहलची आई सुमेधा राऊत हिचाही हात असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान पर्ये येथे उत्कर्षाची मैत्रीण म्हणून गेलेली साखळी येथील सुधा नाईक हिची चौकशीही आज वाळपई पोलिसांनी केली. यावेळी तिने सांगितले की, "गोवा बंद'च्या दिवशी स्नेहल आपल्याजवळ बसली होती. स्नेहलने आपण समाजसेविका असून उत्कर्षा ही माझ्या भावाला रोज फोन करते, असे सांगितले. यावेळी आपणास फसवून स्नेहल पर्ये येथे घेऊन गेल्याचे सुधा नाईकने सांगितले.

सारा गावच शोकमग्न
उत्कर्षाच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सामील झाले होते. प्रत्येकाचेच डोळे अश्रूंनी डबडबले होते आणि तिचा हकनाक बळी घेतलेल्या मंडळींबद्दल त्यांच्या मनात संताप खदखदत होता. अत्यंत तल्लख, सांस्कृतिक कार्यक्रमात पुढाकार घेणारी, सर्वांशी मिळूनमिसळून वागणारी, अजातशत्रू असा उत्कर्षाचा नावलौकिक होता. वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी तिला अशा प्रकारे मृत्यू यावा ही कल्पनाच सहन करणे ग्रामस्थांसाठी महाकठीण बनले आहे. तिला अखेरचा निरोप देताना ग्रामस्थ अक्षरशः थरथरत होते. तिच्या मृत्यूमुळे परब कुटुंबीयांवर तर दुःखाचा पर्वतच कोसळला आहे. कारण भविष्यात तीच या कुटुंबाचा मोठा आधारवड बनली असती.

No comments: