Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 26 July, 2010

सह्यांच्या मोहिमेला विरोध करणारेच हल्लेखोर शक्य

कवठणकर इस्पितळातून परतले

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) - पोलिस ड्रग माफिया संबंधीच्या विरोधात छेडण्यात आलेली सह्यांची मोहीम थांबवण्यासाठी दबाव आणलेल्या व्यक्तींनीच हा हल्ला केल्याचा संशय "एनएसयूआय'ने व्यक्त केला आहे. दरम्यान, म्हापसा येथील वृंदावन इस्पितळातून सुनील यांना आज घरी पाठवण्यात आले. तर, या हल्ला प्रकरणात पोलिसांनी संशयित हल्लेखोराचे रेखाचित्र प्रसिद्ध केले आहे. तसेच, म्हापसा व अस्नोडा भागातील "हिस्ट्री शीटर'ना पोलिस स्थानकावर बोलावून त्यांची चौकशी सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे.
कॉंग्रेस पक्षाचा विद्यार्थी विभाग असलेल्या "एनएसयुआय'चे अध्यक्ष सुनील कवठणकर यांच्यावर परवा रात्री अस्नोडा येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा एनएसयुआयच्या गोवा शाखेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हा हल्ला लोकशाहीवर आणि समस्त गोव्यातील विद्यार्थ्यांवर झालेला असून तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा संघटनेचे राष्ट्रीय प्रतिनिधी गौतम भगत यांनी दिला आहे.
त्याचप्रमाणे, या हल्ल्याला घाबरून सह्यांची मोहीमही थांबवली जाणार नसून ती अधिक गतीने तीव्र केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या मोहिमेला गोव्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन राज्यात ड्रग व्यवसायात गुंतलेल्या लोकांना उघडे पाडण्यास मदत करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
सह्यांच्या मोहीम हाती घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुनील कवठणकर यांना गुन्हा अन्वेषण विभागाने समन्स करून चौकशीसाठी पोलिस स्थानकात बोलावले होते. यावेळी त्यांच्यावर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच,ड्रग प्रकरणात आणखी काही पोलिस अधिकारी गुंतले असल्याचा आरोप श्री. कवठणकर यांनी केला होता.

No comments: