Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 27 July, 2010

केरोसीन भ्रष्टाचाराची चौकशी करा

विरोधकांकडून सभागृहात जोरदार मागणी
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): राज्यातील एकूण ७१५ केरोसीन फिरत्या विक्रेत्यांपैकी ३१५ विक्रेते केवळ सासष्टी तालुक्यातील कसे, असा खोचक सवाल करून हे केरोसीन नेमके कोठे जाते, गरिबांच्या वापरासाठी सबसिडीवर उपलब्ध केले जाणारे हे केरोसीन काळ्याबाजारात जाते हे स्पष्ट असताना सरकार त्याविरुद्ध कोणतीही कारवाई का करत नाही अशा प्रश्नांचा भडिमार आज विरोधकांनी नागरीपुरवठामंत्री जुझेे फिलिप डिसोझा यांच्यावर केला. यापूर्वीच्या अधिवेशनातही हा विषय उपस्थित करूनही मंत्र्यांकडून त्यासंबंधीची कोणतीही कारवाई केली जात असल्याची तक्रार विरोधकांनी यावेळी सभापतींकडे केले.
मांद्रेचे आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला एका तारांकित प्रश्नाद्वारे या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. संपूर्ण गोव्याचा विचार करता पेडणे तालुक्यात केवळ ८, सत्तरी ४, सांगे - ७, काणकोणात चार अशा पद्धतीने हे केरोसीन विक्रेते आहे. या उलट एका सासष्टीत संपूर्ण गोव्याच्या ४५ टक्के प्रमाणे ३१५ विक्रेते कसे नेले गेले? हे विक्रेते कोण आहेत, असा सवाल पार्सेकर यांनी केला. त्यावर स्थलांतरित आणि फिरत्या कुटुंबांना प्रामुख्याने या केरोसीनची गरज भासते. इतर राज्यातून येणारा मजूर, कामगारवर्ग त्याचा प्रामुख्याने उपयोग करतो, असे उत्तर देण्याचा मंत्र्यांनी प्रयत्न केला. मात्र गोव्यातील सगळे स्थलांतरित लोक केवळ मडगाव आणि सासष्टीत राहतात की काय, असा बोचरा सवाल पार्सेकर यांनी करताच मंत्री जुझे फिलिप यांची चांगलीच गोची झाली. या प्रकरणी आपण पुन्हा सर्वेक्षणाचा आदेश दिला होता व त्या अनुषंगाने काही लोकांचे परवाने रद्दही करण्यात आल्याचे मंत्री म्हणाले.
तथापि, केरोसीनच्या या व्यवहारातून वर्षाकाठी ३० कोटींची गफलत होत असतो. सबसिडीवर मिळणारे हे केरोसीन प्रामुख्याने पेट्रोल व डिझेलमध्ये मिसळण्यासाठी वापरण्यात येते. खुल्या बाजारदराने ते विकले गेल्याने गरिबांसाठी असलेल्या या केरोसीनचा उपयोग शेवटी काळ्याबाजारासाठीच होतो असे सांगून याची कसून चौकशी झाली पाहिजे असे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी यावेळी सांगितले. सासष्टी तालुक्यातील हे सगळे फिरते विक्रेते आपल्या काळातले नसून काही वर्षांपूर्वी त्यांना परवाने देण्यात आले होते. त्यातील बहुसंख्य नावेली परिसरातील असल्याचे सांगून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी विषयावर बचावाचा पवित्रा घेतला. मात्र पूर्वी जे झाले ते झाले. निदान आता तरी हे केरोसीन काळ्याबाजारात जाऊ नये यासाठी ठोस पावले उतरण्याची मागणी पार्सेकर यांनी याप्रसंगी केली. त्यावर पर्रीकर यांनी "तुमच्या आजूबाजूला भ्रष्टाचार खूपच माजला आहे' असा खोचक टोमणा मुख्यमंत्र्यांना मारला.
सभापती प्रतापसिंग राणे यांनी यावेळी आपले निरीक्षण नोंदवताना या केरोसीनचा पेट्रोल व डिझेलमध्ये मिसळण्यासाठी वापर केला जातो असे सांगितल्याने मंत्री जुझे फिलिप यांची भलतीच पंचाईत झाली.
विरोधी पक्षनेते म्हणाले, नागरीपुरवठा खात्याकडून मिळणारा केरोसीनचा कोटा त्या विक्रेत्याने ठरलेल्या दरात फिरून विकला तर त्याला ७० ते ८० रुपये इतकेच मिळतील. त्यामुळे विक्रेत्यांना चोरट्या मार्गाने ही विक्री करण्याचा मार्ग सरकारच दाखवत असते. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांचे कमिशन वाढविणे ही काळजी गरज बनली असल्याचे पर्रीकर यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच केरोसीन विक्रेत्यांपैकी किमान अर्धे विक्रेते बिगरगोमंतकीय असून त्या सगळ्यांची पुन्हा छाननी करण्याची व या एकंदर प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रा. पार्सेकर यांनी शेवटी केली. त्यावर, सदर प्रकाराची चौकशी केली जाईल असे आश्वासन मंत्री जुझे यांनी दिले.

No comments: