Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 26 July, 2010

ओपीडी क्रमांक बावीस, रुग्ण होतो कासावीस!

-"गोमेकॉ'ची बिकट स्थिती
शैलेश तिवरेकर

पणजी, दि. २३ - गोव्यातील विविध ठिकाणच्या प्रमुख इस्पितळांची स्थिती जशी बिकट बनली आहे, तशीच अवस्था गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या काही भागांची बनत आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे राज्यातील आरोग्यसेवेबाबत केलेल्या सुधारणा व विकासाचा दावा वेळोवेळी करतात परंतु गोव्यातील प्रमुख मानल्या जाणाऱ्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाची स्थिती एखाद्या रुग्णासारखीच बनली आहे.
या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर "मेडिसीन ओपीडी २२' येथील स्लॅब निकामी झाल्याने पावसाचे अर्धेअधिक पाणी आतच गळत असते, तर प्रत्येक ठिकाणी जमिनीवर पाणी असल्यामुळे दर दिवशी हजारो संख्येने येणाऱ्या रुग्णांना या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. असे चित्र समोर असताना आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी आरोग्य सेवेच्या बाबतीत कसली सुधारणा केली आहे असा प्रश्न रुग्णांना पडल्यावाचून राहत नाही. राज्यातील प्रमुख मानल्या जाणाऱ्या इस्पितळाची ही परिस्थिती त्यामुळे आरोग्यमंत्री करत असलेला दावा म्हणजे निव्वळ तोंडाच्या बाता असल्याचेच उघड होते.
या इस्पितळात उपचार घेणारे रुग्ण व तिथे काम करणारे कर्मचारी कोणत्या परिस्थितीत येथे दिवस काढतात हे पाहिले तर आरोग्य सेवेबाबत आपले राज्य अग्रेसर असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या सरकारला आपली मान शरमेने खाली घालावीच लागेल, कारण ज्या जागेत डॉक्टर तपासतात आणि ज्या जागेत रुग्ण नोंदणी करायला थांबतात तिथेच पाणी गळत असल्याने रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशीच परिस्थिती गोव्यातील जवळजवळ सर्वच इस्पितळांची असल्याने आरोग्यसेवा सुरळीत असल्याचे म्हणणाऱ्या आरोग्य मंत्र्यांना सुरळीत म्हणजे काय, याचा अर्थ समजत नसावा,अशी प्रतिक्रिया संतप्त रुग्णांकडून व्यक्त होत आहे.
संपूर्ण राज्यातील विविध तऱ्हेच्या रुग्णावर तथा सामान्य आजार असलेल्या रुग्णांवर याच इस्पितळांत उपचार करण्यात येतात. त्यामुळे इस्पितळात स्वच्छतेवर सर्वाधिक भर देणे गरजेचे आहे. पण राज्यातील या प्रमुख इस्पितळाकडे लक्ष देण्यापेक्षा अधिकाधिक इस्पितळाच्या केवळ इमारती उभारण्यात धन्यता मानणाऱ्या आरोग्य मंत्र्यांना जी इस्पितळे कार्यरत आहेत, त्याकडे आधी लक्ष द्यायला वेळच नाही.
गोमेकॉची दुरवस्था तेथे काम करत असलेल्या कामगारांना जाणवते आणि बोलावेसे वाटते, परंतु आपली नोकरी संाभाळावी म्हणूनच सर्व कर्मचारी "खोपडी सलामत तो पगडी पचास' असेच म्हणून तसेच आरोग्यमंत्र्यांच्या कानांवर जाईल या भावनेने या सर्व दुखण्यांबाबत चकार शब्दही काढायला तयार नाहीत. ते सर्व मुकाट्याने हा प्रकार सहन करीत आहेत. लोकांकडूनही केवळ नाराजी व्यक्त केली जाते. या इस्पितळाला आरोग्यमंत्री विश्वजित राणे व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी एकदा भेट द्यावी व नंतरच राज्याच्या आरोग्य सेवेच्या बाता माराव्यात, असे आवाहन येथे उपचार घेणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी केले आहे.
कॅन्टीन सेवेतही अवाढव्य दर ः
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील कॅन्टीनांत मिळणाऱ्या पदार्थांचे दर हे बाहेरच्या हॉटेलांएवढे असल्याने कॅन्टीन आणि बाहेरच्या हॉटेलात फरक तो काय आहे? असा प्रश्न रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत. कॅन्टीनसाठी लागणाऱ्या सर्व साधनसुविधा सरकारकडून पुरविली जातात, जेणेकरून बाहेरच्या हॉटेलपेक्षा कॅन्टीनमध्ये रुग्णांबरोबर असलेल्यांना आणि येथील कर्मच्याऱ्यांना आवश्यक पदार्थ बाहेरच्या हॉटेल पेक्षा कमी दरात मिळावेत. परंतु इथे मात्र वेगळाच प्रकार पाहायला मिळतो. एक म्हणजे सदर कॅन्टीनांत कोणताही पदार्थ घेताना मोठी कसरत करावी लागते आणि दमछाक होत असते. एका ठिकाणी जाऊन गर्दीत शिरून कुपन घ्यावे लागते आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन कठीण परिस्थितीला तोंड देत पदार्थ घ्यावे लागतात. ही कॅन्टीन सेवा कसली? कॅन्टीनांतील आणि आजूबाजूचा अस्वच्छ परिसर पाहिला की खाण्यापेक्षा उपाशी राहिलेले बरे असेच वाटते.
परप्रांतीय सुरक्षा रक्षकांचा सावळा गोंधळः
तपासणीसाठी येणारे सर्वच रुग्ण काही शिकलेले नसतात, त्यामुळे काही विचारण्यासाठी ज्या अशिक्षित रुग्णांची गाठ या परप्रांतीय सुरक्षारक्षकांशी पडते तेव्हा त्यांची मोठी पंचाईत होते. भाषेचा घोळ होत असल्याने ते सरळ सांगून मोकळे होतात की "आगे जावो'आणि बिचारा रुग्ण किंवा त्याचा नातेवाईक शोधत राहतो. गोवेकर मात्र बेकार असताना परप्रांतीयांचा भरणा कशाला असा प्रश्न उपस्थित होतो.

No comments: