Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 1 April, 2011

खारीवाड्यावरील ६६ घरे जमीनदोस्त

बाजारपेठ बंद, अनुचित प्रकार नाही
वास्को, दि. ३१ (प्रतिनिधी): दक्षिण गोवा बेकायदेशीर बांधकाम विरोधी पथकाने ६००हून अधिक सुरक्षा जवानांच्या उपस्थितीत आज खारीवाडा येथील ‘त्या’ बेकायदा घरांवर बुलडोझर फिरवला. सकाळी सुरू झालेल्या या कारवाईअंतर्गत संध्याकाळपर्यंत ६६ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी कोणतीच अनुचित घटना घडली नसली तरी वास्कोतील ९९ टक्के बाजारपेठ दुपारपर्यंत बंदच होती.
मुरगाव बंदराचे विस्तारीकरण व अन्य कारणांसाठी खारीवाडा येथील जागा खाली करून देण्याबाबत एमपीटीने गेल्या काही वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर याचिका दाखल केली होती. या याचिकेला अनुसरून न्यायालयाने मुरगाव नगरपालिकेला काही महिन्यांपूर्वी सदर बेकायदा बांधकामे पाडण्याचा आदेश जारी केला होता. खारीवाडा येथील ३६३ घरांवर फेब्रुवारी महिन्यात नांगर फिरवला जाणार असल्याची माहिती मिळताच २७६ घरमालकांनी प्रशासकीय लवादासमोर धाव घेऊन स्थगिती मिळवली होती. यानंतर दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने मुरगाव नगरपालिकेला ज्या घरांनी स्थगिती मिळवलेली नाही त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल केला असता मुरगाव नगरपालिकेने या ८७ घरांवर काल (दि.३०) कारवाई करण्याचे निश्‍चित केले होते. परंतु, सुरक्षा यंत्रणा कमी पडत असल्याने कारवाई एक दिवस पुढे ढकलण्यात आली. या दरम्यान, ८७ घरमालकांपैकी १७ जणांनी प्रशासकीय लवादासमोर धाव घेऊन स्थगिती मिळवल्याने ७० बांधकामावर कारवाई होणार असल्याचे निश्‍चित झाले होते.
आज सकाळी ९.३० वाजल्यापासून पोलिस व औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान मिळून सुमारे ५०० जणांच्या उपस्थितीत दोन जेसीबी यंत्रांच्या साह्याने घरे पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. यासाठी तीन गट करून प्रत्येक गटाबरोबर एक दंडाधिकारी व पोलिस अधीक्षक मार्गदर्शन करत होते. खारीवाडा येथे सुरू असलेल्या कारवाईवेळी अनुचित प्रकार घडू नये साठी १४४ कलम लागू करून त्याची कडक अंमलबजावणी केली जात होती. या कारवाईवेळी तीन घरमालकांनी प्रशासकीय लवादापुढे धाव घेऊन स्थगिती मिळवली तर एक संवेदनशील धार्मिक स्थळ असल्याने संध्याकाळपर्यंत ६६ बांधकामे भुईसपाट करण्यात आली.
या कारवाईवेळी मुरगावचे मुख्याधिकारी गोपाळ पार्सेकर, दंडाधिकारी सुदिन नातू, लक्ष्मीकांत देसाई, शंकर गावकर, उपजिल्हाधिकारी लेविन्सन मार्टिन्स, दक्षिण गोवा बेकायदेशीर बांधकाम विरोधी पथकाचे उपजिल्हाधिकारी जॉन्सन फर्नांडिस, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक ऍलन डिसा, पोलिस अधीक्षक रोहिदास पत्रे, पोलिस अधीक्षक उमेश गावकर, मुरगावचे पोलिस उपअधीक्षक महेश गावकर तसेच इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, आजच्या कारवाईवेळी लोकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. या प्रकारासाठी एमपीटी व स्थानिक मंत्री जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया काहींच्या तोंडून ऐकू आली. दरम्यान, आज दुपारपर्यंत वास्कोतील सुमारे ९९ टक्के दुकाने बंद होती. काहींनी निषेधार्थ तर काहींनी दबावाखाली दुकाने बंद ठेवली असल्याचे सांगण्यात आले.
मुरगावचे उपजिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना संपर्क केला असता सदर कारवाई करण्यासाठी २ एप्रिल पर्यंत मुदत होती पण हे काम एकाच दिवसात पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ६ एप्रिल रोजी न्यायालयात याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे. संध्याकाळी पाज वाजल्यानंतर जमावबंदीचे आदेश मागे घेण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी मार्टिन्स यांनी दिली.
-----------------------------------------------------------------------
खारीवाडा येथील घरांवर कारवाई सुरू झाल्यानंतर अनेक कुटुंबांनी आपल्या सामानासह रस्त्यावर ठाण मांडली. आता आमचे काय होणार, आम्ही कुठे राहणार, आमची मुले कुठे झोपणार, असे नाना सवाल त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत होते.
येथील अब्दुल समीर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, आपल्या खोलीसह शेजारच्या आठ खोल्यांमधील कुटुंबांचा (सुमारे ४० व्यक्ती) संसार उघड्यावर आल्याचे सांगितले. सुमारे पाच ते दहा वर्षांपासून ते भाड्याच्या खोलीत राहत होते, आणि घरमालकांनी येणार्‍या संकटाची माहिती दिली नसल्याचे आज ही परिस्थिती उद्भवल्याचे त्यांनी नमूद केले. बहुतांश घरांना स्थगिती देण्यात आली असल्याने आमच्याच घरांवर कारवाई का? त्यांना स्थगिती का नाही? असा सवालही त्यांनी केला.

No comments: