Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 28 March, 2011

इंग्रजी येत नसलेले उपाशी आहेत का? - डॉ. नारायण देसाई

पणजी, दि.२७ (प्रतिनिधी)
गोव्यात प्राथमिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी हवे म्हणणारे तथाकथित इंग्रजीप्रेमी जगात पोट भरावयाचे असेल तर प्राथमिक शिक्षण इंग्रजीतूनच हवे असे खोटे सांगून पालकांची दिशाभूल करत आहेत. जगात जादातर म्हणजेच जवळजवळ ८८ टक्के लोकांचे प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून होत नाही. मग हे लोक आयुष्यभर उपाशीच राहतात का? या प्रश्‍नाचे उत्तर इंग्रजीचा आग्रह धरणार्‍या सर्वच महनिय व्यक्तींनी लोकांना अगोदर द्यावे व त्यानंतरच गोव्यात प्राथमिक शिक्षण इंग्रजीत हवे म्हणून आग्रह धरावा असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ व विद्यार्थिप्रिय शिक्षक प्राचार्य डॉ. नारायण देसाई यांनी केले आहे.
गोव्यात सध्या जो शिक्षणाबाबत घोळ सुरू आहे त्याबाबत बोलताना डॉ. देसाई बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ज्यांना मातृभाषेबद्दल प्रेम नाही, ज्यांना परकीय भाषेबद्दल आस्था असते, त्यांना स्वतःच्या भूमीबद्दल, देशाबद्दल अजिबात प्रेम नसते. या उलट मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेणारी व्यक्ती मातृभूमीशी प्रामाणिक राहते. त्याला संस्कार, परंपरा, संस्कृती याबद्दल आपुलकी असते. जीवनातील प्रत्येक गोष्टीचे त्यांना चांगल्या प्रकारे आकलन होते. ज्यांना मातृभूमी व मातृभाषा यांचा न्यूनगंड वाटतो त्या व्यक्तीच्या भूमिकेबद्दल आयुष्यभर संशयच व्यक्त होत राहणार आहे असे डॉ. देसाई यांनी प्रतिपादन केले.
‘जे मुक्त करते ते शिक्षण’ असे भारतीय संस्कृती मानते. त्यामुळे प्रत्येकाला मातृभाषेतूनच शिक्षण घेणे गरजेचे आहे. मात्र गोव्यातील काही मंडळींनी इंग्रजी माध्यमाचा जो हट्ट धरला आहे व काही राजकारणी त्यांना साथ देत आहेत हे योग्य नाही. भारत व गोवा निर्भय, सुसंस्कृत व सुदृढ होऊन उच्च शिखरावर पोहोचवण्यासाठी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात शिरू पाहणार्‍या या भयसंस्कृतीला हद्दपार करावेच लागेल. त्यासाठी गोवेकरांनी कंबर कसून पुढाकार घेण्याची गरज आहे असे डॉ. देसाई यांनी पुढे बोलताना सांगितले.
जे लोक इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना अनुदानाची मागणी करत आहेत त्यांना मुलांच्या शैक्षणिक विकासाचे काहीही पडलेले नसून मुलांच्या सर्वांगीण विकासाचा बारकाईने अभ्यास न करता ही मंडळी सदर मागणी करत आहेत. असे सांगून डॉ. देसाई म्हणाले की प्राथमिक शिक्षण हे मुलांची घडण, समाजाचा एक कर्तव्यनिष्ठ घटक म्हणून, राष्ट्राचा नागरिक म्हणून आणि संस्कृतीचा वाहक म्हणून व्हावी यासाठी असते. सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेऊन कुटुंब, राष्ट्र, समाज या संस्थांत आपले स्थान स्वीकारण्याची क्षमता मुलांमध्ये येण्यासाठी प्राथमिक शिक्षण हे प्रादेशिक भाषेतूनच व्हायला हवे असे सांगून डॉ. देसाई यांनी मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचे जोरदार समर्थन केले.

No comments: