Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 31 March, 2011

गोव्यातही.. ‘जिकले रे जिकले’

पाकिस्तानचा निम्मा संघ गारद झाल्यावर गोवेकरांना भारताच्या विजयाची चाहूल लागली. त्यामुळे त्यानंतर प्रत्येक गडी बाद होताच गोव्यातील जवळपास प्रत्येक घरात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत या एकाच विषयाची चर्चा सुरू होती. मग पहाटे केव्हा डोळा लागला हे क्रिकेटप्रेमींना कळलेही नाही. ‘दे घुमाके’ या गीतातील शब्द धोनीच्या धुरंधरांनी बुधवारी अक्षरशः खरे करून दाखवले. परस्परांना शुभेच्छा देऊन गोमंतकीयांनी भारताचा विजय साजरा केला. सारा गोवा आनंदसागरात बुडून गेला. रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी क्रिकेटप्रेमींनी मिरवणुका काढल्या आणि भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव केला. अनिश्‍चितता आणि थराराच्या हिंदोळ्यांवर झुलणार्‍या या लढतीतील प्रत्येक क्षण गोंयकारांनी जणू आपल्या काळजाच्या कुपीत बंद करून ठेवला. झिंग यावी असे नृत्य करून तरुणाईने भारताच्या विजयाला सलाम केला. या विजयाची खुमारी कशी वर्णावी असाच प्रश्‍न अनेकांना पडला होता. आता अंतिम फेरीत येत्या २ एप्रिलला भारतीय संघ लंकादहनासाठी सज्ज झाला आहे आणि त्याचबरोबर गोवेकरसुद्धा...!

No comments: