Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 29 March, 2011

कॉंग्रेसकडून सरकारी पैशांवर डल्ला!

पर्रीकर, श्रीपाद नाईक यांची घणाघाती टीका

भाजयुमोच्या भ्रष्टाचारविरोधी यात्रेचा राजधानीत समारोप

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी)
सरकारी मालमत्ता ही आपल्या बापजाद्यांचीच मालमत्ता असलेल्या आविर्भावात कॉंग्रेस सरकार त्यावर डल्ला मारत आहे. आपल्या तुंबड्या भरण्यासाठी विविध योजना कशा शोधून काढाव्यात हे या कॉंग्रेसवाल्यांकडूनच शिकावे. स्वस्त भाजी उपलब्ध करून देण्याच्या योजनेतून फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी महाघोटाळा केला आहे तर कॉंग्रेसचे दुसरे मंत्री आझिलो इस्पितळ खाजगी कंपनीलाच देणार असा हट्ट धरून आपला स्वार्थ साधू पाहत आहेत, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली.
ते आज पणजी येथील कदंब बसस्थानकावर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने काढलेल्या भ्रष्टाचारविरोधी यात्रेच्या समारोपप्रसंगी बोलत होते. यावेळी उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक, आमदार दामोदर नाईक, ऍड. नरेंद्र सावईकर, गोविंद पर्वतकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, सचिव सिद्धेश नाईक व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारी तिजोरीतील ५० कोटी रुपये खर्च करून उभारलेले आझिलो इस्पितळ स्वतःच्या फायद्यासाठी ‘पीपीपी’ तत्त्वावर खाजगी कंपनीला देण्याचा आरोग्यमंत्र्यांचा डाव आहे. गेल्या तीन वर्षांत या इमारतीच्या सुरक्षेसाठी, पाण्याचे बिल आणि अन्य खर्च मिळून तब्बल २ कोटी रुपये सरकारने खर्च केले आहेत. मात्र, लोकांच्या सेवेसाठी या इस्पितळाचा वापर करावा, असे या सरकारला वाटत नाही, असे पर्रीकर पुढे म्हणाले.

महाघोटाळ्यांचेच वर्ष ः श्रीपाद नाईक
हे वर्ष घोटाळ्यांचेच वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे. भारताच्या व गोव्याच्या इतिहासात कधीच झाले नाहीत एवढे महाघोटाळे केंद्रातील आणि राज्यातील कॉंग्रेस सरकारने केले आहेत, अशी टीका खासदार श्रीपाद नाईक यांनी केली. राजकारण म्हणजे पैसा कमवण्याचा धंदा असाच या कॉंग्रेसवाल्यांचा समज झाला आहे. आम आदमीच्या नावाने मते मागणार्‍या कॉंग्रेसवाल्यांनी त्याच आम आदमीची पार दुर्दशा करून ठेवली आहे. ही परिस्थिती बदलायची असल्यास येत्या पाच वर्षांसाठी भाजपलाच सत्तेवर आणा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादानेच
राज्यात बेकायदा खाणी ः डॉ. सावंत
गोव्यातील सरकार खाण लॉबीकडून चालवले जात आहे, असा आरोप यावेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. हे सरकार जनतेच्या समस्या सोडवू शकत नाही. राज्यातील बेकायदा खाणी या मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादानेच सुरू झाल्या असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सचिव सिद्धेश नाईक यांनी बोकाळलेला भ्रष्टाचार संपवण्यासाठी एकजुटीने भाजपला पाठिंबा द्या, असे आवाहन तरुणांना केले.

No comments: