Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 30 March, 2011

शेतकर्‍यांचा आदर करा : पर्रीकर

आरोग्याच्या बाबतीत सर्वांना विश्‍वासात घेण्याचा सल्ला
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): राज्यातील कृषिक्षेत्राचा खरोखरच विकास व्हायचा असेल तर शेतकर्‍यांचा आदर राखणे गरजेचे आहे. सर्व योजनांचे एकत्रीकरण करून त्याचा थेट लाभ शेतकर्‍यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत व त्यासाठी जमिनीचे किचकट कायदे सुधारण्याची आवश्यकता आहे, असे मत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केले.
आज विधानसभेत कृषी, आरोग्य, कारागीर प्रशिक्षण आदी खात्यांच्या कपात सूचनांवर बोलताना पर्रीकर यांनी या खात्यांचा आढावा घेतला व महत्त्वपूर्ण अशा सूचनाही केल्या. फलोत्पादन महामंडळातील गैरकारभारावर नियंत्रण ठेवून फक्त बाहेरून भाजी खरेदी करण्यापेक्षा स्थानिक भाजी उत्पादक शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मुळात समाजात शेतकर्‍याला सर्वांत उच्च स्थान मिळण्याची गरज आहे. पण, दुर्दैवाने तो शेतकरीच इथे कनिष्ठ बनला आहे, असे पर्रीकर म्हणाले.
आरोग्य खात्याचा दिशाहीन कारभार
आरोग्य खात्याबाबत बोलताना पर्रीकर यांनी या खात्याच्या दिशाहीन कारभारावर बोट ठेवले. वर्षाकाठी सुमारे २६ कोटी रुपये अनावश्यक व कमी महत्त्वाच्या गोष्टींवर खर्च होतात. हाच पैसा योग्य पद्धतीने खर्च केला तर राज्यातील सर्व भागांतील वैद्यकीय सुविधा सुधारता येतील. सुरक्षा व स्वच्छतेवरून ११ कोटी रुपये खाजगी संस्थांवर खर्च होतो. या व्यतिरिक्त सरकारी सुरक्षारक्षक व स्वच्छता कामगारांवर ४ कोटींचा वेगळा खर्च होतो. गोमेकॉसारख्या ठिकाणी उच्च सेवा तर स्थानिक आरोग्यकेंद्रांचा कारभार पूर्णपणे कोलमडलेला, अशी विसंगतपूर्ण परिस्थिती सध्या गोव्यात दिसते आहे. १०८ रुग्णसेवा चांगली आहे, पण ही रुग्णवाहिका ३६ रुपये प्रतिकिलोमीटरप्रमाणे सरकारला परवडते काय, असा सवालही त्यांनी केला. मोबाईल तपासणी व्हॅनचा वापर ग्रामीण भागांतही व्हावा, आरोग्य खात्यात १३८ अतिरिक्त चालक आहेत. त्यांना १०८ रुग्णवाहिका सेवेसाठी वापरता येणे शक्य आहे. तांबडी माती येथील टी. बी इस्पितळाची दुर्दशा झाली आहे व याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज असल्याची मागणीही त्यांनी केली. खाजगी कंपनी फक्त लाभासाठी काम करीत असतात व त्यामुळे सामाजिक क्षेत्र म्हणून गणल्या जाणार्‍या आरोग्य क्षेत्राचे पूर्णपणे खाजगीकरण परवडणारे नाही. हृदयचिकित्सा, कर्करोग आदींसाठी खाजगी वैद्यकीय क्षेत्राची मदत अवश्य घ्या. मात्र, निदान उर्वरित सेवा आरोग्य खात्याच्या ताब्यात असणेच उचित ठरेल, असा सल्लाही पर्रीकर यांनी दिला. आरोग्य खात्याबाबत मंत्र्यांनी सर्वांना विश्‍वासात घेऊनच निर्णय घ्यावेत, जेणेकरून अंतिम ध्येय साध्य होणे सोयीस्कर ठरेल, असेही यावेळी पर्रीकर म्हणाले.

No comments: